top of page
कॅव्हिडने होत्याचे नव्हते केले. जणू विकास थांबला, प्रगतीची कवाडे बंद झाली. परंतु आदर्श गाव म्हणून देशात झळकणाऱ्या पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) या गावाने मात्र आपल्या विकासाची गंगा थांबू दिली नाही. प्रतिकूल परिस्थितीत शासन यंत्रणा खंबीर राहिली आणि गावाची साथ लाभली तर कुणीही प्रगती रोखू शकत नाही, हे या गावाने दाखवून दिले. पाटोदा कोणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण गाव म्हणून विकासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. या गावच्या प्रगतिशील वाटचालीचा हा आलेख.

जेमतेम ७०० उंबरठ्यांचं गाव.. पण गावातला गल्ली -बोल स्वच्छतेचा आरसा दाखवणारे. गावाचा विकास म्हणजे काय याचं नुसतं चित्र डोळ्यांसमोर उभं न करता प्रत्यक्षात झालेला विकास दाखवणारं गाव... बागायती शेती असणारे हिरवे गाव .. आणि गावाची ग्रामपंचायतही आयएसओ मानांकन असणारी.! या गावाचं नाव आहे पाटोदा. औरंगाबाद शहरच्या वाळुंज एमआयडीसी परिसराच्या जवळ वसलेलं हे गाव. आज या गावाचा विकास पाहण्यासाठी दूरवरून लोक आवर्जून येतात. अफलातून प्रयोगांमुळे गेली काही वर्षे पाटोदा सातत्याने चर्चेत राहिलं आहे.


काही काळापूर्वी पाटोद्याची स्थिती आजच्यासारखी आश्वासक नव्हती. स्वच्छतेचे वारे न पोहोचलेल्या पाटोद्याची परिस्थिती बिकट होती. गावात पोहोचण्यापूर्वी गाव जवळ आल्याची खबर वाऱ्यावर येत असे. कारण गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. उघड्यावर शौचाला बसणं हा दिनक्रमाचा भाग होता. ही लाजिरवाणी सवय ग्रामस्थांना जडली होती. गावातली गटारं कायम तुंबलेली असत. अस्वच्छतेचं साम्राज्य आणि रोगराईचं माहेरघर अशीच पाटोद्याची ओळख होती. परंतु धोरणी आणि दूरदृष्टीचे नेतृत्त्व गावाचा कायापालट कसे करू शकते, यासह उत्तम उदाहरण म्हणजे पाटोदा गाव ठरले.


वाळुंज एमआयडीसी पाटोदा गावाजवळ होती. गावातले बाया पुरुष तिथे नोकरीसाठी बाहेर पडत. रोजगाराची त्या अर्थाने सुरक्षितता असली तरीही गावाच्या सुधारणेकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. लोकांकडे पैसाही ठीकठाक स्वरूपात होता. पण फक्त पैसा असून गावाचा विकास होत नाही. त्यासाठी गावाला दिशा देणारे नेतृत्व उभे राहावे लागते. पाटोद्याच्या नशिबात पैसा होता आणि त्या त्या पैशाचा योग्य विनियोग करण्याचा धोरणीपणा अंगात असणारे कर्तृत्ववान, दूरदृष्टी असणारे नेतृत्व लाभल्याने गावाचा कायापालट झाला. २००५ मध्ये ग्रामस्वच्गच्छटा अभियानाची सुरुवात खेड्यांमध्ये झाली, तेव्हा आपल्याही गावाचा कायापालट करण्याचा चंग बांधलेलं एक धाडसी, धोरणी नेतृत्व पाटोद्यात उभं राहिलं. .... ते म्हणजे भास्करराव पेरे पाटील! पाटोद्याचं अस्वच्छ रूप बदलून ग्रामविकासाचा निर्धार त्यांनी केला. सरपंच झाल्यावर भास्करराव पेरे पाटलांनी ग्रामविकासाचा चंग बांधून संपूर्ण गावाला सहकार्याची साद घातली. गावकऱ्यांनी मनापासून त्यांना साथ दिली. धोरणी नेतृत्वाला संपूर्ण गावाची साथ लाभल्याने पहिल्याच वर्षी संपूर्ण पाटोदा गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले. त्यानंतर गावाने आजपर्यंत मागे वळून पाहिलेले नाही.

निर्मलग्राम योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पाटोद्याने पटकावल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर या गावाची दखल घेतली गेली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम हा पुरस्कारही २०११-२०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला. २००५ मध्ये भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामविकासाचा विदा उचलल्यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेत गावाच्या कायापालटाला सुरुवात केली. त्यानंतरच्या सात वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावाचे स्वरूपाचं पालटले. २००७ मध्ये निर्मलग्राम योजनेत पातोड्याचा प्रथम क्रमांक आल्यानंतर बक्षिसाची ३ लाख रुपयांची रक्कम गावाला मिळाली त्यातून ग्रामविकासाच्या कामाला सुरुवात झाली.

गावात सुविधा वाढवल्याने कराची रक्कमही वाढवण्यात आली. तरीही मिळणाऱ्या सुविधांचा विचार करता ग्रामस्थांनी करभरणा वेळच्या वेळी केला. सध्या चार हजार रूपये कर ग्रामपंचायत आकारते पण मिळणाऱ्या सुविधांचा लाभ विचारात घेता लोकांची महिन्याची बचतही अधिक होते. पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत १०० टक्के कर भरला जातो, त्यामुळे ४० लाख रूपये कराच्या रूपाने ग्रामपंचायतीकडे जमा होतात. वर्षाचा खर्च ३२-३३ लाखाच्या घरात जातो. उर्वरित रकमेतून ग्रामपंचायत नव्या सुविधा गावाला देऊ करते. गावाच्या विकासाप्रती कटिबद्ध असलेल्या भास्करराव पेरे पाटलांच्या नेतृत्वामुळे गावाला विविध योजनांतर्गत स्पर्धांमध्ये नावाजले गेले. २००७ पासून गावाने २२ पुरस्कार मिळवले आहेत, त्यातील दोन राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणे ही गावासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. स्मार्ट गाव स्पर्धेत गाव पहिल्या क्रमांकावर आले.


लोकांनी कर भरावा. यासाठी पेरे पाटील यांची अफलातून युक्ती
विकासकामे करायची म्हटल्यावर लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीच्या हाती आर्थिक ताकदही असली पाहिजे, ही बाब सरपंचांना माहित होती. ग्रामस्थांनी घरपट्टी, पाणीपट्टीच्या रूपात भरलेल्या कार्टूनच ही ताकद मिळणार होती. पण सरकारी कर भारण्याबाबतची मानसिकता खेकयात काय नि शहरात काय एकसारखीच असते.. कर न भरण्याची किंवा खूप तगादा लावल्यावरच भरण्याची. पाटोदाही याला अपवाद नव्हतं. ग्रामस्थ पाच पाच वर्षे करभरणा करत नव्हते. कर चुकवण्याकडेच लोकांचा कल होता. ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं तेवढेच लोक त्यासाठी म्हामुणकर भारत होते. ग्रामविकास साधायचा तर लोकांना कर भरण्याची सवय लावणं गरजेचं असल्याचे सरपंचांच्या लक्षात आले.
शंभर टक्के कर जमा झाला पाहिजे असं पेरे पाटील यांना वाटत होतं. कारण त्याने गाव सुधारण्याच्या मोहिमेला बळ मिळणार होतं. धोरणी भास्कररावांनी विचारलेला... गावातल्या प्रत्येक व्यक्तीला लागणारी अशी कोणती गोष्ट आहे? उत्तर होतं, धान्याचं पीठ. तेव्हा गावाच्या मालकीची गिरणी टाकायचं पेरे पाटलांनी ठरवलं. 'जे ग्रामस्थ कर भरतील त्यांना वर्षभर धान्य मोफत दळून मिळेल, ' असं २००५ मध्ये जाहीर केलं. या योजनेमुळे लोकांनी वेळेत कर भरणा करायला सुरुवात केली. त्याशिवाय सरपंचांनी अजून एक योजना आणली. ७ एप्रिल हा ग्रामपंचायतीचा वर्धापनदिन असतो. यानिमित्त १ एप्रिलपासून सात दिवसात जे लोक कर भरतील, त्यातून लकी ड्रॉ काढून विजेत्यांना चार पाच गृहोपयोगी वस्तू भेट देण्याची योजना सुरु करण्यात आली. लोकांना त्याचे आकर्षण वाटू लागले. साहजिकच करभरणा आणि पर्यायाने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले. आजतागायत या दोन्ही योजना सुरु आहेत.
ग्रामस्थांना कर भरण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या आणखी काही योजना अरे पाटील यांनी राबवल्या. या राबवताना गावातल्या प्रत्येक करभरणा करणाऱ्या व्यक्तीला योग्य लाभ मिळावा, हा दृष्टिकोन होताच. थोडक्यात, करभरणा करा आणि सेवा मोफत मिळवा' अशी घोषणाच ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात आणली आहे.

ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कचरा व्यवस्थापनाची जबाबदारीही पार पाडली आहे. घरोघरी दोन बादल्या देऊन कचरा वर्गीकरणाची सवय ग्रामस्थांना लावली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून घरटी गोळा होणारा प्लास्टिकचा कचरा पंधरा स्प्रये किलो दराने विकत घ्यायला सुरुवात केली. प्लास्टिक गोळा करणाऱ्या व्यक्तींना तो मोफत दिला जातो. यातून गावातल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीला कचरा वर्गीकरणाची सवय लागली. यात ग्रामपंचायतीचे पैसे जात असले तरीही त्याचा फायदा होतो. ओला कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते आणि शेतकयांना ते दिले जाते.


आता गावामध्ये सर्वप्रथम कर भरणाऱ्या चार व्यक्तींच्या हस्ते वर्षातील चार ध्वजारोहणाचा समारंभ होतो. कोणत्याही ग्रामस्थांसाठी ही बाब नक्कीच भुषणावह आणि अभिमानास्पद असल्याने आता प्रथम कर भरण्यासाठीही ग्रामस्थांमध्ये चढाओढ लागते. ही एका अर्थाने गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रगतीशील आणि सकारात्मक बाब म्हणायला हवी.


कर भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असतेच मात्र पाटोदा ग्रामपंचायतीने लोकांना बक्षीसांच्या माध्यमातून नियमित कर भरण्याची सवय लावल्याने आता गावालाही विकास अंगवळणी पडला आणि त्यातून गावामध्ये ही जागृती कायमस्वरुपी निर्माण झाली आहे. ही सर्व वाटचाल सुरू होती. त्यानंतर गावात सत्ताबदल झाला. मात्र गावाला लागलेली कर भरण्याची सवय मात्र कायम राहिली.


असा केला कोविडशी मुकाबला...

२०२० मध्ये आपल्या देशात कोविड महामारी आली. हे संकट केवळ आरोग्यापुरते न राहता आर्थिक संकटात बदलत होते. सर्व स्तरावर प्रगतीच्या वाटा खुंटवणाऱ्या या काळात पाटोदा गाव मात्र अपवाद राहिले. ॲडव्हान्स करभरणा करण्याच्या सवयीमुळे पाटोदा ग्रामस्थांनी कराचे पैसे वेगळे काढून ठेवल्याने याही काळात गावात जास्तीत जास्त करभरणा झाला होता. तेव्हाही ७ एप्रिलपर्यंत करभरणा करणाऱ्या घरांना सॅनिटायझर, बकेट, हँडवॉश मोफत दिले. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागेल.


पाटोदा ग्रामस्थांनाही या काळात अडचणी आल्या. पण २००५ पासून धोरणीपणाने कारभार करणाऱ्या तत्कालीन सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गेल्या ४-५ वर्षांपासून करामध्ये घरटी २०० रुपये अतिरिक्त आपत्कालीन निधीचा समावेश केला होता. हा निधी कायमच वेगळा ठेवला जात होता. जेणेकरून गावावर आपत्ती आली तर त्यातून बाहेर पडता येऊ शकेल. हाच निधी कविड काळात पाटोद्याच्या ग्रामस्थांना हात देणारा ठरला. नेतृत्वाने दाखवलेली दूरदृष्टी इथं उपयोगी ठरली.


कोविडकाळात लॉकडाउन झाल्यानंतर गावात राहणाऱ्या ज्या लोकांना मदतीची गरज होती त्यांना ग्रामपंचायतीने अन्नधान्याची मदत केली. गावात येणाऱ्या तीन रस्त्यांवर गस्त ठेवून बाहेरून येणारी व्यक्ती थेट गावात प्रवेश न करता विलगीकरणात राहून मगच गावात येईल, याची दक्षता घेण्यात आली. गावातल्या तरुण मुलांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या कामी मदत केली. एखाद्या घरात कविडचा रूग्ण असेल तर त्याला विलगीकरणात राहाण्यास सांगून आवश्यक वस्तूंची मदत घराच्या बाहेर नेऊन दिली जात असे. या सर्व काळजी घेतल्याने गावात संसर्गाचे प्रमाण वाढले नाही. तरीही गावात विलगीकरण केंद्र उभारले, तिथे डॉक्टरांची नेमणूक केली. ऑक्सिजनची उपलब्धता करून दिली होती. सुरुवातीला २५ रूग्ण होते. मग ग्रामपंचायतीच्या इमारतीतील विलगीकरण केंद्रात त्यांची सोय करण्यात आली.


वाळुंज औद्योगिकपरिसरात कामाला जाणाऱ्या लोकांना समजावून सांगितल्याने त्यांनीही बाहेर जाणे बंद केले. गावात फक्त किराणामाल दुकानदाराला महिन्यातून एकदा माल आणण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जायची. गावाबाहेरून आलेल्या लोकांनीही स्वतःच विलगीकरणात राहून मगच गावात प्रवेश करण्याची सवय लावून घेतली. फवारणी मशीन विकत घेऊन आठवड्यातून दोनदा गावात सॅनिटायझरची फवारणी केली गेली. दारोदारी सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांना प्रशिक्षण दिले. ताप, सर्दी होते आहे का हे पाहिले गेले. गावात चाचणी करून काही गंभीर परिस्थिती ओढवल्यास रूग्णाला बाहेरगावच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आल्यास त्यासाठी ग्रामपंचायतीने ॲम्ब्युलन्स सेवेशी करार केला होता. पण सुदैवाने अशी वेळ आली नाही.


पाटोदा ग्रामपंचायतीने राबविलेल्या काही अभिनव योजना
पेरे पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामविकासाकरिता आवश्यक योजना सुरू झाल्यानंतर लोकांना त्याचे आकर्षण वाटायला लागले. या योजनांना त्यांनी सातत्यानं सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी योग्य रितीने निभावताना करस्मी निधीतून गावासाठी विविध सुविधा द्यायला सुरुवात केली. शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट सुरू केला आणि घरटी २० लीटर पाणी मोफत देण्याची योजना अमलात आली. ग्रामपंचायतीचा लोकांशी असलेला संपर्क वाढवण्याकरिता त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी डिजीटल बोर्ड लावून घेतला. त्यावर शुभेच्छा दिल्या जातात.
गावातल्या प्रमुख रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. संपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे उघडी गटारे राहिली नाहीत आणि दुर्गंधीही राहिली नाही. गावात पाण्याची कमतरता भासत नाही. त्यातही मीटर असल्याने जितक पाण्याचा वापर तितकेच पाण्याचे बिल भरावे लागते. गावातील कर जमा करण्याचे प्रमाण वाढले तशातशा सुविधाही वाढू लागल्या. गावात चौकांमध्ये सोलर वॉटर हिटर बसवण्यात आले त्यामुळे गावकत्र्यांना अंघोळीलाही गरम पाणी मिळतेय. सुविधांचा लाभ घेता आल्याने कराच्या पैशांचा सुनियोजित वापर होत असल्याची प्रचिती गावकयांना दररोज येते.
गावातल्या महिलांसाठी ग्रामपंचायतीने वाळवणाच्या पदार्थांच्या मशिनची खरेदी केली. ज्या घराने करभरणा केला आहे त्या घरातल्या बायकांनी आपले साहित्य आणून मोफत ते पदार्थ करून घेऊन जायचे. स्त्रियांना लागणारे सॅनिटरी पॅड्सही गावात मोफत मिळतात. त्याच्या विल्हेवाटीसाठी तीन ठिकाणी मशीन बसवण्यात आल्या आहेत. अंगणवाडीत लावलेल्या मशिनमध्ये 'वापरलेले नॅपकिन जाळा आणि नवीन घेऊन जा' ही योजना कर भरलेल्या घरातील महिलांना फायदेशीर ठरतेय. तसेच गावात चार ठिकाणी धोबीघाट बांधले आहेत, जेणेकरून महिलांना तिथे कपडे धुता येतील. स्वच्छतेचे पालन करता यावे, यासाठी गावात जागोजागी वॉशबेसीन बांधले आहेत.
अशीच सुविधा शेतीसाठीही देऊ केली ती म्हणजे करभरणा करणाऱ्या व्यक्तीला बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दरामध्ये शेतीसाठी ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला जातो.

मुळातच ग्रामस्थांच्या सहकार्य, एकोपा यामुळे हा अवघड काळ सरला. घोळका न करता बसणे, आपल्याच घरात राहणे, गर्दी न करणे, मास्क लावल्याशिवाय,आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडणे ही सारी पथ्ये पाळल्याने गावाला हा काळ खूप अवघड गेला नाही. नोकरीला जाणे थांबले असले तरीही ग्रामपंचायतीने सर्वांची योग्य दखल आणि काळजी घेतली आणि लोकांच्या विश्वासाला खरी उतरली.


या काळात पाटोद्याचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील पहिली ते आठवीची शाळा टाळेबंदीच्या काळातही सुरू होती. पालकांच्या आग्रही भुमिकेमुळे हे शक्य झाले. प्राथमिक शाळा ही मुलांच्या शिक्षणाचा पाया असल्याने सुरक्षेचे सर्व निक्त्र पाळत गावातली शाळा सुरू होती. शिक्षक फक्त बाहेरून येत होते, पण सर्व काळजी घेऊन. ते शाळेत येत होते. आजही गावात लग्नादी समारंभासाठी शासकीय निकष पाळले जातात. शिवाय गाव पहायला बाहेरून येणाऱ्या लोकांनाही लसीकरण पूर्ण झाल्याची अट आहेच. कोविडकाळात गावाने सरकारी योजनांची वाट न पाहता आपत्कालीन निधीचा वापर करून या काळात साधने विकत घेणे, ग्रामस्थांना मदत या सर्व गोष्टी केल्या. कोविडच्या काळातही गावातल्या सुमारे ५० टक्के कुटुंबांनी घरपट्टी भरली होती. कारण लोकांना ते नियोजन करण्याची सवयच लागली आहे. आत्ताही गावातल्या काही व्यक्तींनी कर भरण्यात पहिला नंबर यावा, यासाठी ३ महिने आधी संपूर्ण कर ग्रामपंचायतीत जमा केला आहे. आठवड्यातून दोन दिवस कर गोळा केला जातो. मुळातच कर भरल्याशिवाय कोणतीही प्रमाणपत्र दिली जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण करभरणा ही गावाची सवयच झाली आहे.


माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामविकासाच्या बाबतीत एक म्हण वापरली... 'सासऱ्याच्या जीवावर बायको करायची नसते.’ ́पाटोदा कुणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण गाव म्हणून आज विकासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. 'गाव करील ते राव करील काय'ही म्हण सकारात्मक अर्थाने पाटोदा गावाने खरी करून दाखवली आहे.


(लेखिका पत्रकार आहेत.) ई-मेल : salvivijayalaxmi@gmail.com

bottom of page