top of page

बांध शेतांचा असतो, वेस दोन गावांची असते. आरोग्याचे प्रश्नही कायम वेशीला टांगलेले. ग्रामीण भारतात तर आरोग्याच्या प्रश्नाला घेऊन ग्रामीण जनता असो की शासन-प्रशासन, त्याच्या मुळाशी कुणीच जात नाही. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून शहराच्या ठिकाणी नोकरी, व्यवसायाच्या संधी असताना त्या सगळ्या सोडून, गावातल्या आरोग्य प्रश्नांवर काम करायचे असे ठरवून एक तरुण डॉक्टर नांदेड जिल्ह्यातल्या एका गावी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करतो आहे. कोरोना काळात कोरोनाबद्दल जनजागृती करणे व सोबतच आपल्या गावातील कामाच्या दोनेक वर्षाच्या अनुभवातून त्याला जी आरोग्यविषयक निरीक्षणे आढळली, ती त्याने फेसबुक या माध्यमाचा उपयोग करीत लोकांपर्यंत न्यायला सुरुवात केली. ह्या नोंदी म्हणा वा निरीक्षण 'गावाच्या बांधावरून : एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या डायरीतील नोंदी' या त्याच्या पुस्तकातून प्रकाशित झाल्या आहेत.

डॉ. प्रताप विमलबाई केशवराव असे या अवलियाचे नाव आहे. तो सध्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील खडकी आरोग्य उपकेंद्रावर डॉक्टर म्हणून काम करतो. त्याची पत्नीही वैद्यकीय शिक्षण घेतलेली. डॉ. प्रतिभा ही सुद्धा त्याच्या प्रमाणेच खडकी बाजारच्या लगतच्या गावात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करत आहे. खडकी (बाजार) हे गाव नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर या तालुक्यात येते.

प्रतापकडे आरोग्यविषयक प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. प्रत्येक रुग्ण व त्याचे आजारपण ह्याकडे तो एक विशिष्ट प्रकारची केस या नुसार बघतो. आजार कळला, गोळ्या इंजेक्शने दिली आणि आपले काम संपले किंवा आजार इथे बरा होण्यासारखा नाही तर दुसऱ्या डॉक्टरकडे 'रेफर' करून मोकळे होणे, याप्रकारचा व्यवहार त्याच्या ठायी बिलकूल आढळत नाही.

2003 ची घटना असेल. खासगी वैद्यकीय महाविद्यालये चालविणाऱ्या लोकांची संघटना असलेल्या 'मॅपी' कार्यालयावर शिक्षणाच्या खासगीकरणाच्या विरोधातील एका मोर्चामध्ये त्याने सहभाग घेतला. नुकतीच त्याने मेडिकलची पूर्वपरीक्षा दिली होती. या एका मोर्चाच्या निमित्ताने त्याचा सामाजिक चळवळीशी संपर्क आला व पुढे तो तिथून जे शिकत गेला, त्याचा अवलंब त्याने आजपर्यंत सुरु ठेवलेला आहे.

अमरावती येथे शिक्षण घेत असताना त्याने एसएफआय या विद्यार्थी संघटनेत काम सुरु ठेवले. वैद्यकीय शिक्षणाचे प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न, बीएड शिक्षकांचा प्रश्न अशा बऱ्याच आंदोलनात त्याने सक्रियपणे सहभाग घेतला. याच काळात त्याने महाराष्ट्रभर

भटकंती केली. सामाजिक चळवळीतल्या बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. गरिबी, कुपोषण, निरक्षरता, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण, पाणी, आरोग्य हे सगळे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. अमरावतीत राहत असताना त्याने मेळघाटच्या कुपोषणग्रस्त भागात काम केले आणि तिथून तो थेट पोहचला शंकर गुहा नियोगी यांच्या शहीद हॉस्पिटलमध्ये.

शहीद हॉस्पिटल हे छत्तीसगड राज्यातल्या दुर्गम भागातील दल्ली राजहरा येथे आहे. हा भाग दुर्ग जिल्ह्यात येतो. हे हॉस्पिटल लोखंडाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांनी उभारले होते. आपल्या कामासाठी संघर्ष करायचाच, मात्र सोबतच आपल्या समूहशक्तीने आपल्या हिताच्या काही रचना आपल्याला लोकसहभागातून उभारता आल्या पाहिजेत आणि ते उभारता येणे शक्य आहे हा विचार शंकर गुहा नियोगी यांनी मांडला होता. शेवटचा माणूस, कष्टकरी माणूस हा केंद्रस्थानी ठेवून काम करताना भगतसिंग, आंबेडकर, गांधी, मार्क्स यांच्या विचाराला त्यांनी महत्त्वाचे मानले. कष्टकरी माणसाच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कष्टकरी लोकांचा आपला कार्यक्रम अशा प्रकारची ती चळवळ होती. तिथे प्रतापने जवळपास सहा वर्षे तिथे व्यतीत केला. तिथे त्याने समाज आणि आरोग्य प्रश्नाचे राजकारण समजून घेतले. त्यावर काहीतरी उत्तर शोधून काम करायला हवे, हा त्याचा निश्चय तिथे जवळपास पक्का झाला होता . (या शंकर गुहा नियोगी यांच्याविषयी एक मोठे मराठी साहित्यिक रंगनाथ पाठारे व सुमती लांडे यांनी एक महत्त्वाचे पुस्तक लिहिलेले आहे.)

महाराष्ट्रात परतल्यावर त्याने चार-दोन ठिकाणी लहान-मोठ्या नोकऱ्याही केल्या. नोकऱ्याही धर्मादाय संस्थेने चालविलेल्या रुग्णालयात. लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा आणि रयत रुग्णालय नांदेड आणि अन्यत्रही. मध्यंतरी त्याने लग्न केले व त्याला पत्नी ही वैद्यकीय अधिकारी मिळाली. लग्नानंतर त्याने व त्याची पत्नी प्रतिभाने नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यात काम करण्याचा निर्णय पक्का केला. सध्या तो खडकी आरोग्य केंद्रावर व ती वडगाव या गावात काम करत आहे. रुग्णांचे आजारपण शोधणे, त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करणे, आरोग्यविषयक साक्षरता वाढविण्यासाठी धडपडणे यासोबतच समाजातल्या विविध प्रश्नांना घेऊन तो सातत्याने बोलतो आहे- लिहितो आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न, लोकांच्या समजुती, सार्वजनिक आरोग्याची स्थिती, अंधश्रद्धा, सामाजिक-आर्थिक स्थिती, स्त्री आरोग्य, स्त्री-पुरुष असमानता, वृद्ध लोकांचे प्रश्न अशा बऱ्याच प्रश्नांवर त्याने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. आरोग्याचा प्रश्न हा फक्त आजाराचे निदान करण्यापुरता नसून, तो व्यापक समाजविकासाचा व समाज परिवर्तनाचा प्रश्न आहे, असे मानून तो या दृष्टीने कार्यक्रम आखतो आहे.

कष्टकरी माणसांच्या आरोग्याच्या प्रश्नासंबंधी, कष्टकरी माणसांचा कार्यक्रम आखण्याच्या दृष्टीने त्याचे चिंतन सुरु आहे. त्याने लिहिलेले हे पहिले पुस्तक त्यादृष्टीने केलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या कुठल्याही पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्याने, सामान्य माणसाने व ग्रामीण प्रशासनात काम करणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी इत्यादी सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे.


bottom of page