top of page

उस्मानाबाद जिल्ह्याची ऐतिहासिक व अध्यात्मिक अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला, येडशीतील निसर्गरम्य श्री रामलिंग देवस्थान, कुंथलगिरीतील जैन मंदिर, तेर, धाराशिव लेणी सर्व परिचित आहेत. गेल्या दोन दशकांपासून हा जिल्हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी झुंज देताना दिसतोय, पण इथला इतिहास ही तितकाच दैदिप्यमान आहे.

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास, भूगोल आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वैशिष्ट्यपूर्ण परंपरा अशी अनेक गावे जपत आहेत आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा परंपरा जपणाऱ्या गावांचा हेवा वाटतो. परंपरेने शाकाहारी राहिलेले जोतिबाचीवाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. आजही या गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत. ऐकून आश्चर्य वाटले असेल, तरी हे सत्य आहे.

सूर्याची किरणं पडून चमकणारी बालाघाटची घोटीव काळसर, पिवळी रंगाची खडी डोंगर रांग, निळ्या रंगाच्या प्रेमात पडायला लावणारं निरभ्र आकाश, त्या डोंगरावरून अलगद विहरत जाणारे पाणीदार ढग, हिरव्या रंगाच्या विविध छटा मनमुरादपणे उलगडून दाखवणारी लिंब आणि विविध प्रकारची हिरवी झाडं, पावसाळ्यामध्ये डौलणारे, लोळावंसं वाटावं असं लुसलुशीत गवत. इथलं वातावरण तुमचा नूर पालटवू शकतं. विशिष्ट डोंगर रांगांची कमाल आणि भारावून टाकणारा निसर्ग म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात जोतिबावाडी हे गाव. बालाघाटच्या डोंगर हे रांगेवर वसलेले दोन हजार लोकसंख्या असलेले गाव. जोतिबाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी. जोतिबाचे भव्य दिव्य मंदिर गावामध्ये असल्याने गावाची ओळख जोतिबाचीवाडी म्हणून झाली. सध्याच्या आधुनिक काळात मोठ्या मोठ्या मंदिराची जागा निवासी इमारतींनी घेतली आहे. परंतु जोतिबाचीवाडी मधील ग्रामदैवतेचे मंदिर. त्यातील उत्सव मात्र दरवर्षी वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या स्वरूपात वाढत आहेत हे विशेष. जग किती बदलले तरी गावातील परंपरा व ग्रामदेवता आणि त्या ठिकाणी होणारे विविध पारंपारिक धार्मिक उत्सव कार्यक्रम गावातील लोक तितक्याच आस्थेने व मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. गावातील पुरातन मंदिराच्या जागी तब्बल एक कोटी लोक वर्गणीतून भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे.

दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जोतिबाची यात्रा असते, तेव्हा भक्तांची अलोट गर्दी लोटते. भक्तीमय आणि आनंदीमय वातावरणात यात्रा पार पडते. यात्रेच्या आदल्या दिवशी गावातील सर्व लहान थोर व्यक्ती सायंकाळी जोतीबाच्या दरबारी एकत्रित जमा होतात सोबतीला टिपोर चांदणं ,हवी हवीशी वाटणारी वाऱ्याची मंद झुळूक अशा बहरलेल्या वातावरणात तर्रीबाज वड्या भाकरी, सोबतीला कांदा, कैरी सर्वच गावकरी एकत्रित अस्सल मराठी जेवणाचा स्वाद घेतात... जोतिबावाडीचे वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये मांसाहार केला जात नाही. गावामध्ये कोंबडी आणि तिचे अंडे तुम्हाला चुकुनही सापडणार नाही. अंधश्रद्धेला बळी न पडता येथे प्राण्याचा बळी दिला जात नाही ही वर्षानुवर्षाची परंपरा कायम अबाधित आहे ही आनंदी बाब आहे.

शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय गावात मोठ्या प्रमाणात चालतो. दर दिवसाला दीड हजार लिटर दूध आणि दहा क्विंटल खवा निर्यात केला जातो. आर्थिक ,सामाजिक,आणि शैक्षणिक क्षेत्रात गावाने झपाट्याने प्रगती केली आहे. शाळेच्या डिजिटल रंगरंगोटीसाठी गावातील युवा स्पंदने सरसावली आणि गावातील शाळेचा नूरच पालटला. ‘आपली माती आपली माणसं’ जपत सातत्याने या गावातील युवकांकडून समाजकार्य केले जाते. देशाच्या रक्षणासाठी सैन्य दलात तरुणांचा विशेष सहभाग आहे. गावाचं आणखी वैशिष्ट्ये म्हणजे पूर्ण गावात मराठा समाज वास्तव्यास आहे. गावाचं वैशिष्ट्य ग्राम दैवत जोतिबाच्या यात्रेसाठी बीड, सोलापूर अहमदनगर जिल्ह्यातील आणि भूम तालुक्यातील गावोगावच्या कानाकोपऱ्यातून भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी येतात ही आनंदाची बाब आहे. बालाघाटच्या डोंगर रांगाच्या कुशीत वसलेले विलोभनीय जोतिबा मंदिर सर्वांनचे श्रद्धास्थान आहे. सभोवतालचे निसर्ग रम्य वातावरण सर्वांनचे लक्ष्य वेधून घेते.




bottom of page