top of page

बापाचे आयुष्य संकटात गेले....आजारात बापच गेला...डोक्यावर कर्जाचा बोझा असतानाही आईच्या पाठबळाने मेहनत घेऊन कोणताही क्लास न लावता फक्त यूट्यूबच्या माध्यमातून गेट परीक्षेचा अभ्यास करून दिल्ली येथील आयआयटीला प्रवेश मिळवून तालुक्यातील टाकरखेड्यातील भूषण गुलाब पाटील तरुणांपुढे आदर्श ठरला आहे.

भूषणने आपल्या वडिलांवर आलेले संकट डोळ्यासमोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. त्याची ही दुर्दैवी कहाणी काळजाला हात घालून जाते. तर ‘परिस्थिती नाही‘ असे म्हणणाऱ्या तरुणांना लाजवेल आणि आदर्श ही देऊन जाईल अशा टाकरखेड्याच्या भूषणचा यशोदायी प्रवास तरुणांना लाजवणारा ठरला आहे.

भूषणचे वडील गुलाब आसाराम पाटील हे 1991 ला टाकरखेडा येथील मान्यता नसलेल्या शाळेत नोकरीवर लागले. अनेक वर्षे लोटली तरी त्यांच्या शाळेला मान्यता मिळत नव्हती, अनुदान तर कोसो दूर होते. घरची स्थिती जेमतेम. अवघे 2 बिघे शेती. मजुरी कष्ट करून हे कुटुंब जीवन जगत होते.काही वर्षांनंतर शाळांच्या मान्यतेची यादी जाहीर झाली. मात्र, त्यात गावाचा साखरखेडा असा उल्लेख होता. शासनाच्या परिपत्रकात ‘टा' चा ‘सा' झाला अन शाळा अनुदानापासून वंचित झाली.

वास्तविक साखरखेडा नावाचे गाव महाराष्ट्रात नसताना अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टाकरखेडा शाळा दुर्लक्षित झाली. अनेक वर्षे विनापगारी कष्ट करून शाळा टिकवून मुलाच्या शिक्षणासाठी गुलाब पाटील यांनी कर्ज काढले. कर्ज काढून मुलाची फी भरत होते. 1991 नंतर 20 वर्षांनी 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशाने मान्यता मिळाली. परंतु शासनाच्या जाचक अटी आणि लादलेल्या त्रुटींमुळे आजपर्यंत त्या शाळेला अनुदान मिळालेले नाही.

नशिबाने गुलाब पाटील यांची मांडलेली थट्टा कमी होती की काय म्हणून त्यांना छळण्यासाठी पोटातील गाठीच्या आजाराने ग्रासले. त्यांना मुंबई येथे हलवले. तब्येत अशक्त असल्याने डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्यास नकार दिला. 2016 मध्ये सुकलेला गुलाब कायमचा गळून पडला.

पतीच्या निधनानंतर पत्नीने मुलांना दिले उच्चशिक्षण

पतीच्या दुःखातून सावरत गुलाब पाटील यांच्या पत्नीने आशा स्वयंसेविका म्हणून काम सुरू केले. श्रीमती सुनीता गुलाब पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी आशावर्कर ते शेतमजुरी असे मिळेल ते काम करुन मोठा मुलगा नरेंद्र आणि लहाना भूषण याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट करणे सुरू केले. नरेंद्र याचे एम. ए. झाले आहे. तो देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे.

भूषण हा देखील नावाप्रमाणे भूषण ठरला. औरंगाबाद येथील एमआयटी मधून बी.टेक इंजिनिअरिंग चांगल्या मार्कानी पास झाला. बापाच्या दवाखान्याचे कर्ज अद्याप फिटलेले नव्हते म्हणून जळगावला खासगी कंपनीत नोकरी करू लागला. गेट परीक्षेसाठी त्याने अर्ज केला. गुणवत्तेमुळे भूषणला शिष्यवृत्ती मिळाली होती. ऑनलाईन सबस्क्रिप्शन मिळाले. कोणताही क्लास नाही, कुणाचे मार्गदर्शन नाही. मात्र त्याने फक्त यू ट्यूब वरून अभ्यास सुरू केला. अन त्यात त्याला यश देखील मिळाले.

गेल्या 29 जुलै रोजी भूषण हा दिल्लीला आयआयटीच्या शिक्षणासाठी गेला आहे. गेट परीक्षेच्या माध्यमातून त्याला आयआयटीला प्रवेश मिळाला आहे. तरी पुढील खर्चासाठी दानशूर दात्यांनी पुढे येऊन या निराधार परिवाराला सरळ हाताने मदत करुन दातृत्वाची साथ द्यावी.असे मत गावातील अनेक लोकांनी व्यक्त केले आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे गावासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात भूषणचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



bottom of page