top of page

शिरीषदादा यांची विस्मयकारक आपबिती....

रावेर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्यावर नुकतीच मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिटयूटमध्ये ॲन्जिओप्लास्टी झाली. प्रख्यात हृदय शल्य विशारद डॉ. तिलक सवर्ण यांनी शस्त्रक्रियेपूर्वी ॲन्जिओग्राफी केली.पण ॲन्जिओग्राफीनंतर पुढील ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्याच्या उसंतीत रक्तवाहिनीत टाकलेला कॅथेटर मात्र तसाच कायम राहिल्याने आ.शिरीषदादा चौधरी यांनी जीवन मरणाचा खेळ अनुभवल्याची विस्मयकारक घटना घडली.

 

भुकेला अन्न शोधतो,तहाणलेला पाण्याजवळ जातो.तसा प्रत्येक भक्त आपल्या तल्लीन भक्तीने भगवंत शोधत असताना विठुरायाची एक वेगळीच रीत कायम झाली आहे.भक्ताला भेटायला पांडुरंग आला,असे म्हणतात.पंढरीत झालेल्या जगावेगळ्या भेटीचे वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे.अवघ्या महाराष्ट्राचा आणि वारकरी वैष्णवांच्या मेळ्याचा या भेटीचा आजचा आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे सर्व वैष्णवांचा स्वर्गस्वरूप अनुभूती दिवस.जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभेचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या जीवनात याच आषाढी वारीच्या काळात विठ्ठलनामाचा धावा केला म्हणून अखंडित आयुष्य मिळाल्याची विस्मयकारक घटना घडली असून खुद्द आमदारांच्या या अनुभूतीने त्यांचे राजकीय, शैक्षणिक,सामाजिक आणि कौटुंबिक अनुयायी पूनित झाल्याची भावना व्यक्त करीत आहेत.

 

याबाबत आमदार श्री.चौधरी यांनी आपली आपबिती कथन केली ते म्हणतात, ॲन्जिओग्राफीनंतर मी बेडवर असताना डॉ.तिलक सवर्ण हे माझ्या पत्नी प्राचार्या डॉ. अरूणा चौधरी आणि मुलगी नेहा यांच्याशी पुढील ऑपरेशनबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी बाहेर पडले पण माझ्या रक्तवाहिनीत टाकलेल्या कॅथेटरमुळे अचानक माझ्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना हाक मारली पण ती त्यांना ऐकायला येत नव्हती. वेदना अधिक तीव्र होत होत्या. माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः मी मृत्यू पाहत होतो. पण कोण जाणे कसे काय मी जोरात 'विठ्ठल विठ्ठल' नावाचा उच्चार सुरू केला. त्या अल्पशा वेळेत मी विठ्ठल नामाचा केलेला धावा मला कामी येवून माझ्या छातीतील वेदना कमी झाल्या. एकूणच मला मरणाचा साक्षात्कार जाणवत असताना माझ्याकडून विठ्ठल नामाची शाळा भरली अन् माझी जीवन नौका तरली असे म्हटले तर वावगे ठरू नये. ' बुडते हे जन देखवेना डोळा म्हणोनि ' मतदार संघातील शेतकरी आणि नुकसानग्रस्त शेतीच्या भवितव्यातून मनात सतत असलेले चिंतेचे दडपण वाढत गेले.मतदार संघातील रोजचे मरणदार-तोरणदार भेटींचे व्यस्त कार्यक्रम,विविध प्रश्नांसाठी मुंबई मंत्रालय,जिल्ह्याच्या तसेच दोन्ही तालुक्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी,बैठका आणि त्यामुळे होणाऱ्या धावपळीमुळे हृदयाच्या एका रक्तवाहिनी मध्ये अवरोध निर्माण झाला होता.शस्त्रक्रियेने यावर मात होणार असताना अचानक रक्तवाहिनीत टाकलेला कॅथेटर काळ बनून जीवन यात्रा संपवणार अशी परिस्थिती निर्माण झालीच होती पण म्हणतात ना...

ज्याचा जैसा भाव । त्याला तैसा पंढरीराव ।।

अशा विस्मयकारक स्थितीत मला ‘परब्रम्हलिंगम भजे पांडुरंगम’ म्हणून विठ्ठल नामाचा धावा करण्याचे सुचले आणि छातीचा अवरोध कमी झाल्याने मी जगू शकलो, अशी कृतार्थ भावना आ. शिरीषदादा व्यक्त करतात.


विठ्ठलनामाने हृदयाची कार्यक्षमता वाढते, मिळाली पुष्टी !

विठ्ठलनामाच्या उच्चारामुळे हृदयाच्या ऊर्जेसह कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे वारकऱ्यांच्या सर्वेक्षणातून वैद्यकीय शास्त्राच्या आधारे संशोधन मांडणारे वेद विज्ञान संशोधन केंद्राचे प्रमुख पंडित प्रसाद जोशी यांच्या संशोधनाला आ.शिरीषदादा चौधरी यांच्यावरील आपबितीने पुष्टी मिळाली आहे.पंडित प्रसाद जोशी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१४ सालीच याबाबतचे संशोधन जाहीर केले होते.याचे मार्गदर्शक व माईर्स मेडिकल कॉलजेचे डॉ.रवी प्रयाग,सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्सचे सुधीर नेऊरगावकर, ग्लोबल हेल्थच्या संशोधक डॉ.ज्युथिका लघाटे, रॉयल पुणे नीतिशास्त्र समितीचे प्रमुख डॉ. पंकज जगताप यांच्या दाव्यावर आ.शिरीषदादा चौधरी यांच्या आपबिती आणि त्यातून त्यांना मिळालेल्या एकप्रकारच्या जीवन-दानाच्या घटनेने विठ्ठल नामाचा जप हृदयाची कार्यक्षमता नक्की वाढवतो यावर शिक्कामोर्तब केले आहे.

 

देवच झाले डॉक्टर हा जणू साक्षात्कार !

- डॉ. अरुणा शिरीष चौधरी,

प्राचार्या, आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव

आमच्या सलग चार पिढ्या आदिवासी भागापासून तर शेवटच्या घटकांच्या सेवेचे व्रत घेवून कार्यरत असल्याने लोकांच्या आशीर्वादाने माझे पती आ.शिरीषदादा चौधरी यांना मृत्यूच्या दाढेतून परत येता आल्याचे आम्ही अनुभवले.मी स्वतः आयुर्वेद महाविद्यालयाची प्राचार्या असल्याने आजतागायत आपण डॉक्टरांना देवरुप मानतो.पण विठ्ठल नामाच्या धाव्यातून 'ठ्ठ' च्या वारंवारितेतून छातीवर जोर पडून हृदयाची कार्यक्षमता वाढल्याने आमदार साहेबांना नवजन्म मिळाल्याने आता देवच डॉक्टर म्हणून पुढे आल्याचा हा साक्षात्कार आजन्म लक्षात राहील..

 





bottom of page