top of page


एका समृद्ध घरावर अचानक आलेली बिकट आर्थिक परिस्थिती आणि व्यसनाधीन झालेला घरचा ज्येष्ठ कर्ता पुरुष. अशा परिस्थितीतून काही मार्ग निघेल का असा विचार करेपर्यंतच सासरहून पतीसह अंगावरच्या कपड्यांनिशी दाखवलेला बाहेरचा रस्ता. ध्यानीमनी नसताना एखाद्या गृहलक्ष्मीवर अशी कठीण परिस्थिती ओढवली तर? कडबगावच्या वनिता तंबाके ताईंवर ही वेळ प्रत्यक्षात आली आणि त्यांनी जिद्दीने यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला. त्यांच्या या जिद्दीच्या प्रवासातून आज सोलापूर जिल्ह्याची विशेष ओळख बनलेला प्रियदर्शनी महिला बचतगट साकारला आहे. आपल्या कुटुंबासह इतर अनेक महिलांची आर्थिक विवंचना कमी करत असतानाच आज वनिताताई स्वतः च्या अनुभवाचा लाभ करून देत गावातून किमान वीस नवीन उद्योजिका उभ्या करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवतात. एक महिला दुसऱ्या महिलेची वैरी न होता सखी, सहकारी, हितचिंतक आणि मार्गदर्शक बनली तर समाजाचे चित्र किती सकारात्मक बनू शकते याचे बोलके उदाहरण म्हणून वनिताताईंकडे पाहता येईल. आज मी जी काही आहे, ती केवळ बचतगटामुळे घडले आहे," असं म्हणत बचत गट योजनेला संपूर्ण श्रेय देणाऱ्या वनिताताईंचा आणि त्यांच्या प्रियदर्शनी बचतगटाचा प्रवास जाणून घेऊया.


अक्कलकोट रेल्वे स्थानकाचे गाव असलेल्या वनिताताईंचे शिक्षण दहावीपर्यंतचे. पण, हातात अनेक कौशल्ये आणि विविध गोष्टी शिकण्याची आवड. त्यामुळे त्यांनी वेगवेळ्या हस्तकलांमध्ये सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करण्याचा धडाका लावला. अक्कलकोट ते सोलापूर रेल्वेने रोज ये जा करत त्यांनी सोलापूरमध्ये ग्लास पेंटिंग, निब पेंटिंग असे कोर्सेस केले. त्याचवेळी स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायाला मोठी मागणी होती. त्यांनी तो कोर्स केला आणि ४० मुलांमध्ये ही एकटी धीट मुलगी झपाट्याने शिकत गेली. पुढे क्लासमधल्या ४० मुलांना मार्गदर्शनही करायला लागली. त्या क्लासची फक्त ५०० रु. फीसुद्धा त्यावेळी त्यांच्यासाठी खूप जास्त होती; पण त्यांच्या वडिलांनी नवीन कौशल्य शिकण्याच्या त्यांच्या आवडीला नेहमीच उत्तेजन दिले. ज्यावेळी घराची आर्थिक घडी विस्कटली, तेव्हा वनिताताईंना त्यांचे माहेरचे गाव आणि स्क्रीन प्रिंटिंगच्या कौशल्यानेच पहिला आधाराचा हात दिला. त्याच वेळी त्यांना शासनाच्या बचत गट योजनेची माहिती मिळाली आणि अडचणींमधून सावरण्यासाठी त्यांनी बचतगटाची वाट धरण्याचा निश्चय केला. आपल्यासारख्याच गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या आणखी बारा महिलांना सोबत घेऊन वनिताताईंनी प्रियदर्शनी महिला बचत गटाची स्थापना केली. तेव्हापासून आजवर या बचतगटाच्या माध्यमातून सुरु असलेले व्यवसाय बदलत गेले, पण प्रत्येक बदल प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरला.


आज १० - १० महिलांचे चार ते पाच गट प्रियदर्शनी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत आणि यातील प्रत्येक महिला आज आर्थिकदृटष्टया सबळ आहे. आपल्या पायावर उभी आहेच; पण आपल्या कुटुंबाचा कणासुद्धा बनली आहे. प्रियदर्शनी महिला बचत गटाची स्थापना १९९८ला झाली. या बचत गटातील महिला विविध छोटे-मोठे उद्योग करतात. लहान गावात एकाच प्रकारच्या उद्योगावर आणि उत्पादनावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले तर मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या त्या एकाच उत्पादनाला पुरेशी बाजारपेठ मिळणे कठीण होईल या दृष्टिकोनातून विविध व्यवसाय आणि विविध उत्पादने यांच्यावर भर देण्यात आला. किराणा व जनरल स्टोअर्स, दुग्धव्यवसाय, शिलाई उद्योग, स्क्रिन प्रिटिंग, कापड उद्योग असे अनेक उद्योग या गटातील महिला करत आहेत. या निर्णयामुळे गटातील प्रत्येक महिलेला आपापल्या कौशल्याप्रमाणे काम करण्याची आणि नफा मिळवण्याची समान संधी मिळू शकली. यातून गटाच्या प्रगतीसह प्रत्येक सहभागी महिलेचीही प्रगती साधता आली. या बचत गटाला २१ दिवसांचे ताग प्रशिक्षण मिळाले आहे. या प्रशिक्षणाने महिलांना एक चांगला उद्योग मिळाला आहे. महिलांनी तागाच्या चांगल्या वस्तू बनवून सोलापूर जिल्ह्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात, संक्रांतीतील गड्डा यात्रेत तसेच सकाळ सुपर शॉपिंगमध्येही भाग घेतला होता. सुरुवातीला बचत गटामार्फत किराणा दुकाने सुरु करण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागात उधारीवर सामान नेणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याने हा व्यवसाय काही काळानंतर मर्यादित करावा लागला. त्यानंतर खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरु झाला. सोलापूरचे वैशिष्ट्य असणारी कडक भाकरी, शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी या सगळ्याबरोबरच फराळाच्या पदार्थांचीही सुरुवात करण्यात आली. या पदार्थांची सुरुवात चकलीपासून झाली. अगदी एक किंवा अर्धा किलो चकलीची ऑर्डर असेल तरीही ती कधीच नाकारण्यात आली नाही. हळूहळू व्यवसाय वाढत आज ही आर्डर दररोज २०० किलो किंवा कधी त्याहूनही जास्त इतकी वाढली आहे. सुरुवातीच्या काळात गटाच्या सगळ्या महिला स्वतः मेहनत करत हातानेच चकली करून ऑर्डर पूर्ण करत होत्या पण नंतर कर्ज मंजूर करून घेऊन ३ लाखांचे मशीन बसवण्यात आले. आता दर दहा सेकंदाला बारा चकल्या या मशिनमधून तयार करता येतात. त्यामुळे कितीही मोठी ऑर्डर असली तरी ती सहज पार करता येते.

साहजिकच आता बचतगटाचा व्यवसाय वाढला आहे. विविध प्रदर्शनांमध्ये बचत गटाचा सहभाग असतो. राज्यातच नव्हे तर भारतभरातील विविध प्रदर्शनांमध्ये प्रियदर्शनी बचत गटाने सहभाग नोंदवला आहे. वैशिट्यपूर्ण सोलापुरी चवीचे पदार्थ, तागाची उत्पादने यांची यशस्वी विक्री केली आहे. राज्याबाहेरील प्रदर्शनांमधून वेगळा अनुभव मिळतो, नवीन दृष्टीकोन शिकता येतो, नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या अमलात आणण्याचे मार्गही समजतात आणि आत्मविश्वास वाढतो. प्रदर्शनातील सहभागानंतर गटातील महिलांची अधिक आत्मविश्वासपूर्ण देहबोली बरेच काही सांगून जाते असे वनिताताई सांगतात. मुंबईत जगभरातील बचत गटांचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुमारे ३२ देशांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून फक्त सहा बचतगटांची निवड करण्यात आली होती. ही सुवर्णसंधी प्रियदर्शनी गटाला मिळाली. हे प्रदर्शन केवळ आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन करण्यासाठीच होते. तुमच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी होते. तिथे थेट विक्री करायला परवानगी नव्हती, पण या प्रदर्शनानंतर गटाच्या उत्पादनांना फार मोठी मागणी आली. तिथे मोठमोठे कोट्यवधी रुपयांचे मशिनरीचे सेटअप पाहायला मिळाले. उत्पादने तयार करण्याच्या अत्याधुनिक पद्धती पाहता आल्या. संभाषणकौशल्य, सादरीकरण कौशल्य अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनाच्या यानिमित्ताने आमच्या गटाच्या खेडेगावातल्या बायकांना शिकता आल्या, असे वनिताताई सांगतात. विपरीत परिस्थितीत जगण्याचे उपजत कौशल्य असलेल्या ग्रामीण महिला अशा अनुभवांनी अधिक कुशल होतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. सोलापूर जिल्हा दुष्काळी आणि पाण्याच्या टंचाईला नेहमीच तोंड द्यावे लागणार जिल्हा आहे. गावाची पाण्याची गरज ओळखून बचतगटातर्फे दोन हातपंपांची सुविधा करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थितीव्यतिरिक्तही महिलांना दररोजच्या जीवनात अनेक बाबतीत संघर्षाला तोंड द्यावे लागते. त्यासाठी अनेक विषयांच्याबाबत जनजागृती करत राहणे आवश्यक असते. त्यासाठीच गावात होणाऱ्या लसीकरण मोहीम, माता बालसंगोपन, आरोग्यविषयक जनजागृती, हुंडापद्धत, बालविवाहाला विरोध व जनजागृती, दारूबंदी, एड्सविषयी जनजागृती, आहार सप्ताह, किशोरी मुलींना प्रशिक्षण अशा विविध समाजोपयोगीकामांतगटातील महिलांचा सक्रिय सहभाग असतो. आज आमच्या बचतगटाला खूप यश मिळत आहे,

सोलापूरची खासियत म्हणून आमच्या बचत गटाचे नाव घेतले जाते, पण आम्ही सुरुवातीला खूप संघर्षाचा काळही पाहिला आहे. मुलांची फी भरण्यासाठी जमेल तसा प्रवास करून प्रदर्शनांमध्ये सहभाग घेत असू. गटातील प्रत्येकीची परिस्थिती थोड्याफार फरकाने तशीच होती. उत्पादन कसे तयार करायचे, त्याचे मार्केटिंग कसे करायचे हे सगळे आम्ही धडपडत, चुका करत शिकत गेलो. पण आज माझ्या २४-२५ वर्षांच्या अनुभवाचा फायदा इतर धडपडणाऱ्या तरुण महिलांना करून द्यायचा ही माझी भविष्यासाठीची योजना आहे. माझ्या या लहानशा गावात जशी मी घडले, माझ्या बचतगटाच्या माध्यमातून आज माझी ओळख एक उद्योजिका म्हणून निर्माण झाली आहे, तशाच किमान वीस उद्योजिका या गावातूनच घडाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे साह्य, विशेषतः त्यांचे उत्पादन विकण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा माझा विचार आहे, असे प्रियदर्शनी गटाच्या अध्यक्ष असलेल्या वनिताताई सांगतात. गटाच्या जवळपास २५ वर्षांच्या वाटचालीत आम्ही खूप चढउतार पाहिले. अनेक अडचणींवर मात केली. सण २०१७ मध्ये एसटी स्टॅन्ड परिसरात आमच्या गटाच्या स्टॉलसाठी खास जागा देण्यात आली. नुकताच येऊन गेलेला कोरोनाचा काळ सर्वांचीच परीक्षा पाहणारा होता. हे संकट आम्ही संधी म्हणून स्वीकारले. सर्व नियम पाळून, स्वच्छतेची काळजी घेऊन आमचे काम सुरु होते. लोकांना घरपोच सेवा द्यायला आम्ही याच काळात सुरुवात केली. थोडी आणखी गुंतवणूक करून फूड व्हॅन सुरु केली. या व्हॅनचा दरवाजा उघडला की त्याचाच फूड काऊंटर तयार होतो. त्यामुळे लोकांना आणखी सुलभतेने सेवा देणे शक्य झाले.


बचत गट माझ्या आणि माझ्या सहकारी महिलांच्या आयुष्यात फक्त आर्थिक समृद्धी घेऊन आला नाही, तर त्याने आम्हाला स्वाभिमान दिला, सामाजिक जबाबदारीचे भान दिले, अनेक मानसन्मानाचे क्षण दिले. कडूगोड अनुभवांची शिदोरी दिली. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळवून दिले, इतकेच नव्हे तर आमच्यासारख्या अल्पशिक्षित महिलांना विद्यापिठाचाही सन्मान प्राप्त झाला. या पुरस्कारांशिवाय जोडली गेलेली अनेक नाती हे वेगळेच वैभव आहे. अनेक शाळकरी मुली कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आमच्याकडे मदतीला येत असत. त्यांचा अभ्यास घेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करत आम्ही त्यांच्याकडून लहान सहान कामे करून घ्यायचो. आता त्यातील अनेक जणी उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम आणि आदर आम्हाला खूप समाधान देऊन जातो. घराघरातील गृहलक्ष्मीला सन्मानाची वाट दाखवणाऱ्या या बचतगटामुळेच आमची ही प्रगती होऊ शकली आहे, या शब्दांत वनिताताई बचत गट योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या बचत गटाच्या भांडवलात आजपर्यंत ३० टक्कयांपेक्षाही जास्त वाढ करून दाखवणाऱ्या आणि भविष्यात आणखी नवीन उद्योजिका तयार करण्याची जिद्द बाळगणाऱ्या वनिताताई आणि त्यांच्या सर्व सहकारी महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ग्रामगौरवकडून मनःपूर्वक शुभेच्छा!!

bottom of page