top of page

रावेर - कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाने स्वीकारल्यानंतर याबाबत कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या तज्ज्ञांनी अभ्यासक्रमाचा आराखडा तात्काळ निश्चित करून शासनाला सादर करावा म्हणजे येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू,अशी आग्रही भूमिका आ. शिरीषदादा चौधरी यांनी मांडली. यासाठी पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मुख्य कार्यालयात आ. शिरीषदादा चौधरी यांनी आढावा घेण्याच्या उद्देशाने बैठक दिली.


महाराष्ट्रात कार्यरत एकूण चार कृषी विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधणारी नियंत्रण संस्था म्हणून महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद काम करते.परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे,शिक्षण संचालक हेमंत पाटील आणि प्रशासन विभागाचे सहसंचालक डॉ.वैभव शिंदे,प्रवेश नियामक समितीचे समन्वयक डॉ.वाय.सी. साळे यांनी आ.चौधरी यांचे स्वागत करून परिषदेच्या कामकाजची माहिती दिली. त्यानंतर औपचारिक बैठक पार पडली.यावेळी ग्रामगौरव प्रकाशनाचे विवेक ठाकरे,चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ.अरुणा चौधरी, पुणे कृषी महाविद्यालयाचे प्रा. चारुदत्त चौधरी आदी उपस्थित होते.

 

कृषी शिक्षणाचा मूलभूत हेतू साध्य व्हावा :

राज्यात अनेक विद्याशाखांमधून दरसाल पदवी आणि पुढील शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मी स्वतः एमएसस्सी (कृषी) आहे.तथापि एकूणच परिस्थितीत कृषी शिक्षणाचा शेतकरी बांधापर्यंत लाभ पोहचवण्यात अद्याप सुद्धा आपण कमी पडत आहोत,अशी खंत आ. शिरीषदादा चौधरी यांनी बैठकीत बोलून दाखवली.अगदी शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश झाल्यास पहिल्यापासून विद्यार्थ्यात रुची निर्माण होईल.कृषी शिक्षण हे निश्चितपणाने शेतकर्‍यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी विद्या शाखा आहे.ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळावी,शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे आ.चौधरी म्हटले.कृषी शिक्षणाचा मुळ हेतू साध्य होईल,अशी भूमिका असल्याने येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावुन धरणार असल्याने परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमच्या मुसूद्याची प्रक्रिया जाणून घेतली.

 

दरम्यान,सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून, तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे.मुलांना शालेय जीवनापासून शेती कशी करावी, याची माहिती मिळाल्यास त्यांच्यामध्ये शेतीविषयी आवड निर्माण होईल. शेती कशी केली जाते, त्यासाठी कोणती तयारी करावी,शेतीसाठी काय काय करावे लागते आदी बाबींचा समावेश अभ्यासक्रमात राहील. पेरणी ते कापणीपर्यंतची माहिती देणारा हा अभ्यासक्रम मुलांसाठी अधिक उपयुक्त कसा होईल,यादृष्टीने त्याची आखणी करण्यात येत असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना शेतीच्या प्रात्यक्षिकासाठी कुठे नेणार?हाही प्रश्न होता,या काही अडचणी लक्षात घेता सुटीच्या दिवशी क्षेत्र भेटी देऊन शेती शिक्षण दिले जावे असे सर्वकष धोरण तज्ज्ञ समितीकडून तयार होत असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी परिषदेचे शिक्षण संचालक हेमंत पाटील यांनी दिली. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे यासाठी आग्रही पाठपुरावा करणार असल्याचे आ.चौधरी यांनी नमूद केले.

पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत आ.शिरीषदादा चौधरी यांचे स्वागत करतांना शिक्षण संचालक डॉ.हेमंत पाटील,डॉ. यशवंत साळे,डॉ.वैभव शिंदे, समवेत विवेक ठाकरे, डॉ.सौ.अरुणा चौधरी


bottom of page