
ग्रामविकासाची आंतरिक तळमळ असलेल्या आणि त्यासाठी तनमन वेचून गावपातळीवर उत्तम कार्य करणाऱ्या मातीशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचे नाव बहुधा आपल्या पंचक्रोशीपर्यंतच मर्यादित राहते. अशा कार्यकर्त्यांची, त्यांच्या गावांची, त्या गावांना नवी उभारी देणाऱ्या सरपंचांची ओळख उर्वरित महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला व्हावी आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत इतरांनीही ही विकासकथा पुढे न्यावी असा विधायक विचार अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी पुढे आणला आहे. त्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, पर्यावरण, शेती, व्यवसायाभिमुखता, स्वच्छता, पर्यटन अशा २५ विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि गावा- चा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या गावांचा शोध घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ममाय ग्राम : शोध ग्रामीण महाराष्ट्राचाफया उपक्रमातून महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतींमधून शंभर सर्वोत्तम गावे निवडली जाणार आहेत.
वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वतः सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डु या आपल्या गावाचे सरपंच म्हणून निवडून आलेल्या श्री. जयंत पाटील यांनी ग्रामीण विकासाचे राजकारण आणि समाजकारण यांचा जवळून अनुभव घेतला. उमेदीच्या वयात आणि काळात मिळालेला हा अनुभव आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीशिवाय खरा विकास साध्य होऊ शकत नाही याची त्यांना असलेली जाणीव यातून त्यांनि ग्रामविकासाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला. सरकारी केवळ योजनांचा लाभ घेत राहण्याने विकासाचा खरा मार्ग गवसणार नाही, तर त्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी आपली खरी शक्ती, स्वायत्तता आणि क्षमता ओळखून त्यावर काम केले पाहिजे यासाठी त्यांनी जागृती सुरु केली. ग्रामीण भागाचे, तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न सरकारदरबारी लावून धरून त्यांचा पाठपुरावा करत राहण्याचे श्रेयही त्यांना जाते. या दीर्घकाळ केलेल्या कामाचे फलस्वरूप म्हणून आज ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष या नात्याने सातत्याने अनेक गावांमध्ये मार्गदर्शक व्याख्याने देतात, सतत पायाला भिंगरी लागल्यासारखी भ्रमंती करून गावोगावी होत असलेल्या चांगल्या कामांची नोंद घेत असतात. यातूनच साधारण दशकभरापूर्वी असलेले गावामधील स्थानिक नेते, सरपंच आणि गावांचा विकास यांचे चित्र बदलत चालल्याचे त्यांनी टिपले. या सकारात्मक बदलांचे सुकाणू युवा आणि सुशिक्षित सरपंचांच्या हातात आहे आणि त्यांच्याकडे उत्तम कल्पना आणि आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे हेही त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच या तरुणांना पुढेही असेच सकारात्मक कार्य करण्यासासाठी प्रोत्साहन मिळत राहावे, त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे आणि इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांनी ही ममाय ग्राम : शोध ग्रामीण महाराष्ट्राचाफया उपक्रमाचे संकल्पना मांडली आहे. ग्रामगौरव या ग्रामविकास याच विषयाला वाहिलेल्या मासिकाचेही उद्दिष्ट तेच आहे. गावांचा विकास म्हणजे आपल्या माणसांचा विकास, हे सूत्र जपण्याच्या उद्देशानेच संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावी होत असलेल्या सकारात्मक कामांचे वृत्त सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेच ग्रामगौरव कार्यरत आहे. त्यामुळे सकारात्मक विचारांनी प्रेरित असलेल्या ममाय ग्राम : शोध ग्रामीण महाराष्ट्राचाफा उपक्रमासाठी ग्रामगौरव माध्यम प्रायोजक म्हणून जबाबदारी उचलत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या गावांना ग्रामविकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवणारे सगळे सरपंच या उपक्रमात सहभागी होतील आणि इतर गावांसाठी उत्तम आदर्श घालून देतील. विकासाच्या वाटेवर सर्वांनी हातात हात घालून पुढे जावे आणि सुंदर गावांचा सुंदर महाराष्ट्र घडावा हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.