top of page

ना. धों. महानोर : ग्रामीण जीवनाशी इमाने नाते सांगणारा नव्हे, खरे जगणारा रानकवी...


मृत्यू हे जीवनाचं वास्तव,पण जगणं इतरांसाठी आनंददायी करण्याचं सामर्थ्य अथवा प्रतिभा फार थोड्याच्यांच वाट्याला येतात,त्यात कविवर्य पद्मश्री ना.धो.महानोर एक. आपल्या प्रदीर्घ जीवन प्रवासात कला,साहित्य आणि संस्कृतीची कधीही विस्मृतीत न जाणारी विण गुंफणारे रान कवी श्री महानोरच होते.मृदू,हळव्या मनाचा सवेदनशील अन् विलक्षण प्रतिभा संपन्न असा हा वृक्ष अखेर उन्मळून पडला,त्यांना विनम्र पूर्वक आदरांजली !


ना.धो.यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे.मराठी साहित्य जगात केवळ औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची शान त्यांच्यामुळे उंचावली होती. पत्रकार म्हणून माझा संपर्क त्यांच्याशी व्हायचा.विशेषत: पाणी,माती आणि शेतीबद्दल त्यांचा दृष्टिकोन फारच वास्तववादी आणि दूरगामी होता. त्यांनी पाणलोट क्षेत्रात केलेल्या कार्याची फलश्रुती महाराष्ट्र अनुभवत आहे.मोठ्या सिंचन योजनांना विरोध न करता,पाणी आडवा पाणी जिरवा हा शेतीसाठी महत्वाचा मुद्दा मांडणारे ते पहिले कवी होत. शेती,माती आणि शेतकऱ्यांशी विलक्षण लळा असलेले महानोर ग्रामीण जीवनाची एक गाथाच होती. फलोत्पादन क्षेत्रातील त्यांचे कार्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील आपल्या पळासखेडे या गावी जगविलेली सिताफळाची बाग उत्तम नावीन्यपूर्ण पद्धतीचे उदाहरण ठरले.कला क्षेत्राशी असलेलं भावनिक प्रेम आणि कलाकारांप्रती असलेला जिव्हाळा त्यांनी सिताफळाचे केलेले 'लताफळ' हे नामकरण गानसम्राज्ञी लता मंगेशकर बद्दलच कलेच्या प्रेमाबद्दलचं प्रतिक म्हणता येईल.मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी अशीच होती. प्रामुख्याने त्यांच्या रानातील तसेच पावसाळी कवितांनी "जैत रे जैत " सारख्या अनेक मराठी चित्रपट गीतांनी मराठी रसिकांच्या मनावर गारूड केले. महानोरांनी आपल्या कवितेवरील प्रेमामूळे पुढाकार घेत प्रसिद्ध बालकवी त्र्यबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म शताब्दी भव्य उत्सव जळगावात १९९० मध्ये केला तसेच काव्य वाचनाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम २००५ मध्ये ३२ कविंसह आयोजित केल्याने कवी व साहित्य रसिकांना उत्तम मेजवानी मिळाली होती.या कार्यक्रमात स्थानिक कवी लोकमतचे संपादक विजय बाविस्कर,नाट्यकर्मी शंभु पाटील, जैन उद्योग समूहाच्या सौ.विनिता जैन,तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविण साळुंखे, आर्किटेक्ट शिरीष बर्वे,सीमा जोशी,प्रतिमा जगताप आदींचा सहभाग होता .'गगनाला पंख नवे' हा स्वत:च्या कवितांच्या तीन तासांचा कार्यक्रम देश-विदेशात सुमारे ७०० वेळा सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असल्याने ग्रामीण जीवन सांगणारा नव्हे स्वतः जगणारा हा महान अवलिया निसर्गाचा एक अविष्कारच होते.

अभिनेते नाना पाटेकर आणि महानोर यांची हृदय स्पर्शी गळाभेट

सन २००५ साली गुजराथ मधील एका कंपनीच्या बीटी क्वाटन कापूस बियाणाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी एक शेतकरी मेळावा जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यासाठी सबंधित कंपनीने चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांना आमंत्रित केले होते. शेतकऱ्याचा कार्यक्रम म्हणून साहाजिकच कविवर्य महानोर यांना सुद्धा सन्मानाने आमंत्रित करण्यात आले होते.श्री.महानोर यांना पाहून नाना पाटेकर यांनी नम्रतापूर्वक अभिवादन करून त्यांची गळाभेट घेतली. या कार्यक्रमात बी.टी.बियाण्याबद्दल कमी आणि महानोरांच्या कविता, गीतांबद्दल बोलून नाना पाटेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मंत्रमुग्ध केले होते. महानोर या कार्यक्रमाला येतील अशी कल्पना पाटेकर यांना नसावी पण महानोरांच्या उपस्थितीने भारावून नाना यांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी आपल्या अगदी सहज आपल्या भावना व्यक्त केल्याचे सर्वांना अनुभवायला आले होते.

पळासखेडे फक्त एक गाव नसून अजरामर साहित्याची भूमी

महानोरांच्या कविता आणि साहित्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले.दिग्गज राजकारणी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यापासून ते सर्वच पक्षातील राजकारण्यांनी पळासखेड्याला एकदा तरी भेट दिली आहे.महानोर तर यशवंतराव चव्हाणांचे मानस पुत्र म्हणूनच गणले गेले.त्यामुळे यशवंतरावांच्या मूळे ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले गेले होते.शेती,माती आणि जलसवर्धनाचे काम लक्षात घेवून शरद पवार यांनी पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर १९९० मध्ये संधी दिली होती.खेड्यात राहून जगालाच खेड्यात येण्यास खुणावणारे व्यक्तिमत्व म्हणजे महानोर होते. उत्तुंग राजकीय मंडळी यांच्याशिवाय मराठी साहित्य विश्वातील सर्वच दिग्गज पळासखेडयात येऊन गेलेत. महानोरांची काव्य संपदा किती प्रभावी होती,हे सागण्याची गरज नाही.महानोरांचे पळासखेडे हे गाव मराठवाड्यात असेल तरी खान्देशच्या जळगाव जिल्ह्याला अगदी लागून असल्याने जळगाव येथेच ना.धो.महानोर यांचे वास्तव राहिले.आपल्या जीवन प्रवासात साहित्य क्षेत्रातील असा एकही पुरस्कार नाही जो महानोरांना मिळाला नाही. साहित्य अकादमी नवी दिल्ली,गदिमा पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार,शाहीर विठ्ठल उपम, पद्मभूषण पू. ल. देशपांडे पुरस्कार,उत्कृष्ठ काव्य गीत पुरस्कार,भाव सरगम कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या हस्ते सत्कार अशा त्यांना मिळालेली पुरस्काराची यादी खूप मोठी आहे. कृषी आणि जल सिंचन क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार सुद्धा त्याच्या सन्मानार्थ दिले गेले आहेत. साहित्य,कला संस्कृतीसह कृषी अशा विविध क्षेत्रांतील त्याचं कार्य एक मोठा ठेवा आहे.पाणी,माती,शेती आणि ग्रामीण समाजाशी इमान राखणारे ना.धो.महानोर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सर्जनशील व्यक्ती गमवला आहे.

अक्षरे चुरगाळीत मी अमृताचे कुंभ प्यालो

अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो.

पद्मश्री ना.धो.महानोर यांच्या कवी मनातील समाज सन्मुखवृत्ती आणि कारुण्याभाव याचे दर्शन घडविणाऱ्या या ओळींनी त्यांच्या पावन स्मुर्तीस ग्रामगौरव प्रकाशन टीमच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अन् विनम्र अभिवादन !


( लेखक : ज्येष्ठ पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत)

संपर्क : 8888889014.)




Komentarze


bottom of page