top of page

बारीपाड्याचे भाग्यविधाते

Updated: Jan 13, 2023

एखादी व्यक्ती संकल्प करुन, पारंपरिक मानसिकतेचे जोखड झुगारुन, नव्या विचारांनी प्रेरित झाली तर ती गावाचा विकास करु शकते, आपल्या राज्याला मार्गदर्शक ठरु शकते. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचे झेंडे रोवू शकते. त्यासाठी संकल्प हवा ध्येयपूर्तीचा... आदर्श हवा संघटन कौशल्याचा... आणि कामात पारदर्शकता हवी. यातून इतरांना मार्गदर्शक ठरणारे दीपस्तंभासारखे काम उभे राहू शकते. बारीपाड्याच्या चैत्राम पवार यांनी हे करून दाखवलं आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशाने काय प्रगती केली, याचा आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपण खूप मोठी प्रगती केलेली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर, स्वावलंबी होऊ पाहत आहोत. आपल्या देशाचं शक्तीस्थान असलेल्या जल, जंगल आणि जमीन या गोष्टींकडे स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांत फारसं लक्ष दिलं गेलं नाही... जे आता गेल्या २० वर्षांपासून गती घेऊ पाहत आहे. देशातील विविध भागांमध्ये नैसर्गिक साधनसामुग्रीचा जनतेसाठी उपयोग करून घेण्यात, काही गावं पुढे आली आहेत. यात महाराष्ट्रातील बारीपाडा या आदिवासीबहुल गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ज्या गावाला पिण्याचे पाणी चार-पाच मैलावरून आणावे लागत होतं, तेच गाव वन-जल सजगतेमुळे, आता आपल्या आसपासच्या आठ गावांना पाणी पुरवत आहे. अन्नधान्याबाबतही बारीपाडा गाव स्वावलंबी झालं आहे. ही किमया साधली आहे बारीपाडा येथील चैत्राम पवार यांनी. स्वतः आदिवासी असलेल्या चैत्राम पवार यांनी स्वत: मेहनत घेऊन वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने बारीपाड्याला स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि इतरांना मदत करण्यासाठी सक्षम बनवलं आहे. पवार यांच्या प्रयत्नांमुळे बारीपाडा जागतिक पातळीवर पोहोचलं आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद....


प्रश्न : बारीपाड्याचं नेमकेपण कशात आहे?

उत्तर : बारीपाडा हे गाव धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येते. धुळ्यापासून ४० किलोमीटर आणि पिंपळनेरपासून २५ किलोमीटरवर असलेलं बारीपाडा हे खरं म्हणजे आदिवासीबहुल गाव आहे. तीच त्याची ओळख. गावात एकूण १०८ कुटुंबं असून, लोकसंख्या साधारण सातशेच्या घरात आहे. या गावातील बहुसंख्य आदिवासी हे मोलमजुरी करणारे, परक्या गावात, परक्या राज्यात जाऊन राहणारे आणि जगण्यासाठी दुसऱ्यावर विसंबून असलेले होते. एम. कॉम झाल्यानंतर मी वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आलो. या आश्रमाच्या मदतीने डॉक्टर आनंद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावात कामाला सुरुवात केली. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला. जनप्रबोधन आणि लोकशिक्षणामुळे आज या गावात वृक्षतोडबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी यासारख्या विविध योजनांचे सकारात्मक परिणाम झाले. आज हे गाव निसर्गसौंदर्याने आणि वनसंपत्तीने समृद्ध झालं आहे.


प्रश्न : जल, जंगल, जमीन, जन, जनावर ही संकल्पना काय आहे. ?

उत्तर : गावाबाहेर जाऊन नव्हे, तर गावात राहूनच गावाचा विकास करता येऊ शकतो. लोकांना वगळून नव्हे, तर लोकांना सहभागी करुन घेऊनच त्यांची प्रगती करता येऊ शकते. आपण जल-जमीन-जंगल- जन-जनावर यांचा जोपर्यंत सामूहिकपणे विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला गावांना आत्मनिर्भर करता येणार नाही. बारीपाडा या गावामध्ये ग्रामपंचायत आणि शाळा सोडली, तर एकही घर सिमेंटचे सापडणार नाही. गावात एकही घर दुमजली नाही. इतकं गाव जैवजाणिवेने भारलेलं आहे. गावाभोवतीची अकराशे एकर जमीन ही जंगल म्हणून संरक्षित केलेली असून तिचा विकास केला जात आहे. यात कुठेही रासायनिक खतांचा, फवारण्यांचा, औषधांचा उपयोग केला जात नाही. यामुळे जमिनीचा पोत सुधारला. त्याचबरोबर पाण्यातील रसायनांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं. गावातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता, गावानेच शासनहिताचा निर्णय घेऊन, गावात येणारी एसटी बंद केलेली आहे. त्यासाठी गावाने दोन मोफत रिक्षांची सोय केली आहे. ज्याचा खर्च गावातून जमा होणारा दंड, निधी यातून केला जातो.


प्रश्न : बारीपाड्याचा विकास आलेख कसा उंचावला ? उत्तर : गावाने केलेल्या प्रगतीमुळे दरिद्रयरेषेखालील कुटुंबांची संख्या शून्य झाली आहे. म्हणून आमच्याकडे शासनाची अन्नसुरक्षा योजनाच कार्यान्वित नाही. ज्या गावात खाण्यासाठी अन्नधान्य मिळणे दुरापास्त होतं, तेच गाव आता ज्वारी, बाजरी, गहू आणि इंद्रायणी तांदळाचे उत्पादन करून इतर गावांना पुरवठा करतं. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे बचत गटांमार्फत सामूहिक भोजन सुविधा उपलब्ध आहे. यात निसर्गातील भाजीपाल्यांचा आस्वाद घेता येतो.


प्रश्न : पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात काय सांगाल ?

उत्तर : २०१८ मध्ये झालेल्या यूथ फॉर डेव्हलपमेंट या उपक्रमात नवी दिल्ली येथे २९ राज्यांच्या १००० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यात मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. विविध भागातील प्रतिनिधींनी आणलेली माती एकत्र करून त्यात लावलेला पिंपळवृक्ष पंतप्रधानांना भेट देण्यात आला. उपासमारी, बेकारी, व्यसनाधीनता आणि गरिबीची अवहेलना सोसणारं बारीपाडा डोळस आणि समर्पित कार्यामुळे जागतिक नकाशावर पोहोचलं. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आमच्या या कामाची दखल घेण्यात आली.


प्रश्न : बारीपाड्याचा रानभाजी महोत्सव काय आहे. ?

उत्तर : बारीपाड्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या विविध रानभाज्यांचा महोत्सव हा राष्ट्रीय स्तरावर गौरवला गेला आहे. देशभरातून हजारो लोक यानिमित्ताने गावाला भेट देतात. या रानभाज्यांवर आनंदवन येथील शैलेश शुक्ला तसेच पुण्याच्या सई हळदुळे या संशोधन करत आहेत. निसर्गातून प्राप्त होणाऱ्या विविध रानभाज्या तसेच औषधी वनस्पतींच्या माहितीची कवाडे या निमित्ताने जगाला खुली होणार आहेत. बारीपाड्यात गव्हाच्या शेतीवर विविध प्रयोग केले जात आहेत. चारसूत्री भाताची लागवड केली जात आहे. बटाटा, कांदा याचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. ज्वारी, बाजरी, वरई, भातला, कुळीथ, तूर, भुईमूग हरभरा, फळभाज्या एवढेच नव्हे तर गुलाब, स्ट्रॉबेरी आणि कलमी आंबे यांच्यामुळे बारीपाडा श्रीमंत झालं आहे. गाव एकत्र आलं तर काय होऊ शकतं, याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमचं बारीपाडा! वृक्षतोड बंदी, कुऱ्हाड बंदी, चराईबंदी यासारखे लोकहिताचे निर्णय घेतल्याने वृक्षांचं-जंगलाचं मोठ्या प्रमाणावर संवर्धन होत आहे. या विधायक निर्णयांमुळे शासनातर्फे या गावाला मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जातात.


बँकॉक येथील संस्थेतर्फे जागतिक पुरस्कार
बारीपाड्यात पूर्वीच्या काळी पोटापुरती शेती होती. जे शिकले, ते बाहेर गावी निघून गेले. रोजगार आणि मजुरीचा प्रश्न भेडसावत असतानाच कुपोषण आणि व्यसनाधिनतेने गावाला भयग्रस्त केले होते. अर्ध्याहून जास्त गाव दारिद्र्यरेषेखाली होता. मात्र, चैत्राम पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे गावाने या सर्व समस्यांवर मात केली. प्रगतीची वाट चालताना चैत्राम पवार यांनी आपले नैसर्गिकस्त्रोत आणि साधन सामग्री याला इजा होणार नाही, त्याचं संवर्धन होईल, याची काळजी घेतली. आज बारीपाड्यामध्ये ७० टक्के झाडं साग आणि मोहाची आहेत. हेच या गावाचं उत्पन्नाचं साधन बनलं आहे. गावात निसर्गत: उगवलेल्या असंख्य वृक्ष, वेली पिकांची जोमाने वाढ होत असून, गेल्या दहा वर्षांत येथील सर्व जैवविविधतेची शास्त्रीय पद्धतीने अधिकृत नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारचं हे देशातील एकमेव गाव आहे. या गावाने साधलेल्या प्रगतीचा आलेख बघून बँकॉक येथील आयएफडी या संस्थेने त्यांना जागतिक स्तरावरचा द्वितीय पुरस्कारानं गौरवलं. याचबरोबर बारीपाड्याला राष्ट्रीय इंडियन बायोडायव्हर्सिटी, महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार तसेच सेवाव्रती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे.

प्रश्न : वनसंरक्षण समिती कसं काम करते ?

उत्तर : गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि गावकऱ्यांना शिस्त लावण्यासाठी, गावातील लोकांचीच वनसंरक्षण समिती बनवण्यात आलेली आहे. पक्ष्यांना त्रास होवू नये म्हणून, गावात मोबाईल फोनदेखील वापरले जात नाहीत. गावातील बचत गट, आरोग्य सेवा, स्वच्छता, परिवार नियोजन, प्रौढ साक्षरता, सकस आहार, शिक्षण, रोजगार, सौरऊर्जा यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग नोंदविला जातोय. नियम मोडणाऱ्यांकडून आकारलेल्या दंडाच्या पैशातून समितीमार्फत गावात सामूहिक खर्च केला जातो. महिला व पुरुष यांना समान संधी दिली आहे. अतिशय दुर्गम भागातील बारीपाडा दुर्लक्षित म्हणून अवहेलना सहन करत होतं. तेच बारीपाडा आज पर्यटकांसाठी पर्यटनाचं ठिकाण आणि संशोधकांसाठी संशोधन केंद्र बनलं आहे.


प्रश्न : यातून वनौषधींची संधी आहे काय ?

उत्तर : बारीपाड्यात जे काम उभे राहिले आहे, त्याने आपल्या प्राचीन आयुर्वेद उपचार पद्धती व आयुर्वेदिक औषधांबद्दलची उत्सुकता वाढली आहे. पूर्वीपासून आपल्याकडे निसर्गाच्या मदतीने काही उपचार केले जातात.आज वैद्यकशास्त्र खूप प्रगत झाले आहे. मात्र आयुर्वेदिक उपचारांना आजही मोठी मागणी आहे. विविध रोगांवर लागणारी औषधीयुक्त वनस्पती, जडी, बुटी भारतात दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्यांची पारख करणाऱ्यांची आणि आहे ती नैसर्गिक जैवविविधता जतन करण्याची. आम्ही ते करत आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार ज्या वनस्पतींचा एखादा भाग फळ-फूल-पाने, खोड किंवा खोडाची साल आणि मुळे ही मुख्यत्वे औषधोपचार पद्धतीत वापरली जातात. त्याचा शरीरावर अनिष्ट अथवा घातक परिणाम संभवत नाही. मनुष्य प्राण्यावर सर्व प्रकारच्या व्याधीवर अतिशय गुणकारी वनौषधीचे भांडार निसर्गाने मानवाला उपलब्ध करून दिले आहे. त्याची लागवड आणि संवर्धनाची गरज आहे. प्रचलित औषधी मानवाची संस्कृती आणि धर्मानुसार विकसित झाली. खऱ्या अर्थाने त्याचा समाजाला उपयुक्त असा वापर विसाव्या शतकापासून चालू झाला. पर्यावरण आणि विकाससंबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतात सुमारे ७० टक्के लोक पारंपरिक हर्बल मेडिसीन वापरत असल्याचे स्पष्ट केले आहे. औषधी वनस्पती गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करून औषधे बनविण्याच्या उद्योगात अर्ध अथवा पूर्णवेळ कामात गुंतलेल्या लोकांची संख्या देशात प्रचंड आहे. त्यामध्ये स्त्रीवर्गाची संख्या लक्षणीय आहे. मोठमोठ्या जंगलात या वनौषधींचे प्रमाण लक्षणीय असून, एकूण जंगल निर्यातीत ८० टक्के वाटा हर्बल वनस्पतींचा आहे.


प्रश्न : हर्बल मेडीसीनची सद्यस्थिती कशी आहे. ?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे, की एकूण ६२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची हर्बल वनस्पती उत्पादने निर्माण होत असून, भविष्यातील वाढत्या मागणीमुळे त्याची उत्पादकता २०५० पर्यंत पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचेल. भारतात प्रचंड जैविक विविधता आणि उपलब्धता असूनही आज हर्बल वनस्पती मेडिसीनच्या निर्यातीत आपला वाटा फक्त अर्धा टक्का आहे. या जागतिक स्पर्धेत देशाला टिकायचे असल्यास आपणाला औषधी वनस्पतीची शास्त्रीय पद्धतीची लागवड विकसितच करावी लागेल. संशोधनाद्वारे विकसित हर्बल मेडिसीनचे पेटंटही मिळवावे लागतील. उत्तम दर्जाच्या मालाला गुणवत्तेनुसार बाजारपेठेची चणचण भासत नाही. फक्त मार्केटिंगचे तंत्र जमले पाहिजे. औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि स्थान अनन्यसाधारण असले तरी जंगलातील वन्यप्राणी आणि किफायतशीर लाकूड उत्पादनानंतर त्यास दुय्यम स्थान दिले जात होते. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पाड्यापाड्यावर प्रबोधन, जनजागृती व्हायला हवी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना या क्षेत्रात आपण सर्वोत्तम कामगिरी करु शकलो, तर देशासाठी ते भूषणावह ठरेल.

(लेखक साहित्यिक, पत्रकार आहेत) ई-मेल : editor.gramgaurav@gmail.com

Comments


bottom of page