top of page

म्हारोळ्याच्या बचतगटाची बातच न्यारी !

औरंगाबाद शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असेलेले बिडकीन गाव सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पामुळे मोठ्या चर्चेत आहे. कष्टकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिडकीनपासून अलीकडे अवघ्या काही अंतरावर असलेल्या म्हारोळा या छोट्याश्या खेडेगावातील असलेल्या कालिंदी प्रवीण जाधव यांनी आपल्या सोबत काही महिलांना घेऊन 30 ऑक्टोबर 2017 रोजी श्री स्वामी समर्थ महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली. नियमित बचतीसोबतच बचत गटाला आणि गटातील महिलांना आर्थिक हातभार लागून त्या सक्षम व्हाव्यात, असा उद्देश ठेवून जाधव यांनी यामागे नियमित शेतीकामासोबतच जोडधंदा सुरु करण्याचा मानस ठेवला होता.

पण बचत करायची म्हणजे आधी उत्पन्नाची सोय करावी लागणार. त्यासाठी उत्पन्नाचा स्रोत पण शोधावा लागेलच. हेच पाहून कालिंदी जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन 2018 ला टेरा कोटा ज्वेलरी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर मुंबईतील बहुप्रसिद्ध एका महिलेने या बचत गटाला डिझाईन देऊन त्याप्रमाणे ज्वेलरी बनवून घेण्याची ऑर्डर दिली. यातून या बचत गटाला काम आणि पैसे दोन्हीही मिळू लागले. यातून मिळणारा पैसा कमी प्रमाणात असल्याने बचत गटाने स्वतः मुंबई आणि दिल्ली आदी ठिकाणी या ज्वेलरीचे स्टॉल लावले. यातून बचत गटाला मोठा नफा मिळाला.

अन्‌‍ मार्ग सापडला !

या कोटा ज्वेलरीसोबत बचत गटाने अधिकच्या आर्थिक कमाईसाठी जात्यावरच्या दाळी आणि शेतात उत्पादित केलेला ओवा सोबत विक्रीसाठी ठेवला. विशेष म्हणजे मुंबईत या स्टॉलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कामे पण चांगली झाली. पण याच दरम्यान कोरोनाने डोके वर काढले आणि बचत गटाचा पूर्ण व्यवसायच डबघाईला आला. त्याच्या वस्तूंची विक्री पूर्णतः थांबली. कुठे स्टॉल पण लागत नव्हते. पण याच काळात या बचत गटाच्या महिलांना मुंबईत लावलेल्या स्टॉलमुळे एक गोष्ट लक्षात आली होती की, शहरातील माणसांना गावाकडील वस्तू घेण्यात मोठा रस आहे. खरेदी करताना कोणताही मोलभाव न करता मालाची क्वालिटी पाहून ते खरेदी करतात. वस्तू चांगली, दर्जेदार असली तर हा आपला कायमचा ग्राहक बनतो. त्यामुळे या महिलांनी स्वतःचे उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः कालिंदी जाधव यांनी ठरवले की आपल्या शेतात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करून तो उत्पादित झालेला माल आपण स्वतःच विकायचा. त्याला गटातील महिलांनीही साथ दिली.

पुढे बचत गटाच्या अध्यक्ष कालिंदी जाधव आणि सचिव अलका जाधव यांनी आपल्या बचत गटातील इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेत आतापर्यंत केलेल्या उद्योगाच्या पैशातून पुढील व्यवसायासाठी लागणारी गिरणी आणि अन्य सामान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या होकारानंतर उद्योगासाठी लागणारी सर्व आवश्यक साधन सामग्री बचत गटातर्फे खरेदी करण्यात आली. 2 जुलै 2021 पासून बचत गटामार्फत 'रेडी टू कुक' या संकल्पनेतील समर्थ इन्स्टंट दाळबट्टी आटा, समर्थ पौष्टिक ढोकळा आटा आणि समर्थ पौष्टिक ईडली आटा तयार करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला तयार झालेला माल हा बचत गट बिडकीन आणि परिसरातच विक्री करीत असे. दिवसाला 30 ते 35 किलो पिठाची विक्री व्हायची. मात्र त्यातून फारसा नफा बचत गटाला मिळत नव्हता. यामुळे बचत गटाच्या सदस्य महिलांनी औरंगाबाद शहर, बजाजनगर आणि जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी परिसर आणि तालुके हेरले. याठिकाणचे मॉल आणि किराणा दुकानात हे पीठ विक्रीसाठी देण्यात आले. दर्जा चांगला असल्याने अल्पावधीतच या पिठाला पसंती मिळाली. आणि यामुळे बचत गटाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. आज रोजी एक क्विंटलपेक्षा जास्त पीठ दिवसाकाठी विकले जात असून, त्यातून या बचत गटाला दररोज 5 हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत असून, त्या माध्यमातून 35 ते 40 हजार रुपये नफा महिन्याकाठी या बचत गटातील महिलांना मिळत आहे.

निकल पडी !

खरे तर अन्नपदार्थ म्हणजे नाशवंत. पण श्री समर्थ बचत गटाने हे पीठ योग्य प्रक्रिया करून तयार केले असल्याने ते बराच काळ टिकते. याचाच फायदा आता बचत गटाला होत आहे. या बचत गटाने तयार केलेले दाळबट्टी पीठ आणि ढोकळा पीठ आता लवकरच बहुप्रसिद्ध असलेल्या डी मार्टमध्ये देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठीची सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे पत्र देखील डी मार्ट प्रशासनाकडून बचत गटाला प्राप्त झाले आहे. लवकरच अंतिम मिटिंग होऊन हे बचत गटाचे दोन्ही प्रॉडक्ट सर्वसामान्य जनतेसाठी मॉलमध्ये उपलब्ध होतील.

कर्जफेडीचाही फायदा

या बचत गटाने सुरुवातीला आयसीआयसीआय बँकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दिवसरात्र मेहनत घेऊन बचत गटाच्या महिलांनी या कर्जाची परतफेड मुदतीत केली. त्यामुळे गटाला पुढे अडीच लाख रुपयांचे कर्ज मिळाले. हे कर्ज देखील बचत गटाने फेडले. त्यामुळे पुढील वाढीव कर्जासाठी बचत गट पात्र ठरला आहे.


Comments


bottom of page