लोकसहभागातून समृध्द बनलेलं गाव : खोर
- लक्ष्मण जाधव
- Aug 10, 2022
- 4 min read
"शब्द नवे, शस्त्र नवे, शब्दांचे शस्त्र नवे,
संघर्षात पांघरलेल्या शब्दांनाही वस्त्र नवे"
पुणे जिल्हा म्हणजे विद्येचे माहेरघर. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सुजलाम-सुफलाम जिल्हा. डोंगर दऱ्या खोऱ्यातून आजही भटकंती केली तर दिसतात ते इतिहासाची साक्ष देणारे सह्याद्रीचे कडे आणि त्याच्याकडे डोळे भरून पाहिल्यानंतर इतिहासाच्या घटनांचे वारंवार होणारे स्मरण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा रेल्वे जाळ्यांच्या माध्यमातून जोडणारे प्रसिद्ध दौंड जंक्शन आणि बारामतीसारखी आर्थिक राजधानी. याच पुणे जिल्ह्यात पुरंदर, दौंड आणि बारामती या तिन्ही तालुक्याच्या शिवेवरती डोंगररांगात एकूण बारा वाड्या वस्त्यांमध्ये तयार झालेलं दुर्गम भागातील 'खोरगाव'. 'गाव करी ते राव न करी' ही उक्ती प्रत्यक्षात उतरवून समस्त गावकऱ्यांच्या सहभागातून आज हे गाव समृद्ध बनले आहे. त्याचीच ही कहाणी.
साधारण दहा ते बारा वर्षापूर्वीची या गावची परिस्थिती आपण पाहिली तर येथील जनतेच्या माथी कायमचा दुष्काळ पाचवीला पुजलेला. पावसाचे प्रमाण अत्यल्प. जमिनीची परिस्थिती अतिशय चढ-उताराची. मुळात त्या वेळी येथील जनतेला रोजगार हमीच्या कामाशिवाय आणि पाण्याच्या टँकर शिवाय पर्यायच नव्हता. रस्त्यांची अतिशय दुर्दैवी अवस्था. आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर. गावात रुग्णालय नसल्यामुळे केडगाव, यवत, सुपे या गावांना जाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. शिक्षणापासून येथील बरीच बालके उपेक्षित होती आणि दळणवळणाच्या साधनांचा विचार केला तर, तीही अतिशय अत्यल्प होती. बैलगाडी किंवा वडाप यांच्याशिवाय पर्याय नव्हता. गावशिवारात शेती भरपूर प्रमाणात पण पाण्याअभावी शेतीलाही उत्पन्न नाही.
रोजगारासाठी येथील तरुणांना किन्नर आणि ड्रायव्हर बनल्याशिवाय दुसरा रोजगाराचा पर्याय नव्हता. मुळात हे गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेलं. दर पाच वर्षातून या गावाला दुष्काळाला सामोरे जावंच लागायचं. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. या गावाला अध्यात्माचा वारसा असून सुद्धा, गावातील मंदिरे, मशिदीची अवस्था अतिशय वाईट होती. त्या गावाची अवस्था पाहिली तर येथील पाठीमागच्या पिढ्यांनी उपसलेली कष्ट व तेथील जुने वाडे, कौलारू घरे, माळवादी घरे, छपरे पाहिली की यांच्या वाट्याला अत्यंत हालाखीची परिस्थिती आली असावी असे वाटते. येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, येथील तरुण मुला-मुलींसमोरील असंख्य अडचणी असे अनेक प्रश्न अस्वस्थ करीत होते. कारण 'रोजगार हमी, काम कमी अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही', 'तुम्ही प्या कपान आम्ही पितो बशीनं, ना कप बरा ना बशी बरी' अशी अवस्था या गावाची झालेली. मग हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे असे येथील तरुण मुला-मुलींच्या लक्षात आलं. हे दारिद्य्राचे जगणं सोसणं अजून किती दिवस चालायचं, या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केले. मुळात या जगात सर्वात तरुण देश म्हणून भारताची ख्याती आहे. 55 टक्के इतके प्रमाण या देशात तरुणांचे आहे. तरुणांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर खूप चांगला कायापालट होऊ शकतो याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील, सुनीता लोहार, समाधान काळे अशी अनेक उदाहरणं आहेत, की ज्यांनी तरुणाईच्या साथीने गावाचा कायापालट करून राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या गावची नाव कोरली आहे.
त्यांचाच आदर्श घेऊन 2010 या साली खोर या गावात चिंतन-मनन बैठका सुरू झाल्या. गावातील तरुण, शेतकरी, गाव पुढारी, महिला, सर्व वडिलधारी मायबाप, जनता एकत्र आले. आपला गाव बदलायचा आणि अन्य गावातील लोक येथे भेटीसाठी आले पाहिजेत. अनेक योजनांनी समृद्ध अशी गावीची ओळख निर्माण करायची, हा विडाच गावातील प्रसिद्ध असणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या कृपेने येथील तरुणाईने उचलला.
क्षितिज तुटून पडलं तरी ते क्षितीज पेलण्याची ताकद ज्यांच्या अंगात असते, त्याला तरुण म्हणतात. असाच या गावचा तरूण सरपंच, गावातील पुढारी, उपसरपंच व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकूण अकरा वर्षात 121 कोटीचा निधी खेचून आणला. गावातील उद्भवलेल्या प्रश्नांवर तो खर्च करून त्याच्यावर मात केली. अगदी लोकसहभागातून सुद्धा वर्गणी गोळा करून त्याचाही गाव समृद्ध बनण्यासाठी हातभार लावला. संत गाडगेबाबा खूप सुंदर शब्दात म्हणतात की.... 'खापरात केला काळा,कोळून पिलं तत्वज्ञान, जाणिलास नवा धर्म, माणसांचे दिनवर्म काय, हाती घेऊन खराटा, काठील्यास वाटा मनामनात, ह्या बाह्य अंतरंगाबरोबरच अंतरंग मनालाही निर्मळ करण्याच काम' या वचनानुसार येथील तरूण सरपंच व त्यांच्या टीमने केलं.
या गावाचं महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाने महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार यांच्यामार्फत जेवढा निधी विविध योजनांमार्फत वितरित केला जातो, त्यातील जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा येथील गावकऱ्यांनी केली. आमदार, खासदार यांच्या फंडातील निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पालकमंत्री निधी, जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्यामार्फतचा निधी, कृषी पाटबंधारे समाजकल्याण महिला व बालकल्याण रोजगार हमी, कमांड हॉस्पिटल असे अनेक निधी आणण्यात त्यांना यश मिळाले. विशेष उल्लेख करावासा वाटतो की, अगदी 14 वा वित्त आयोग, 15 वा वित्त आयोग, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना, वनविभाग, इंदिरा आवास योजना, अपंग कल्याण योजना, सेस फंड अशा अनेक योजनांची गावात अंमलबजावणी केली.
काही वर्षांपूर्वी गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुरवस्था होती. पण गेल्या दहा वर्षात या गावाला जोडणारा प्रत्येक रस्ता राजमार्गासारखा सुशोभित करण्याचं काम या गावातील तरुणाईने केलं. शेतीच्या बाबतीत विचार केला तर 1980 ते 90 च्या दशकात खोरगाव वांग्यासाठी प्रसिद्ध होतं. इतर पिके पण घेतली जायची. पण प्रश्न होता पाण्याचा. हेच ओळखून मुबलक प्रमाणात शेतीला पाणी मिळावे, आधुनिक शेती, प्रगती व्हावी म्हणून प्रथम गावामध्ये 83 शेततळी तयार करण्यात आली. विहीर पुनर्भरण यासारखे उपक्रम राबवण्यात आले. शेतीशाळा उपक्रम चालू करून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 40 हेक्टर बांधावर फळबाग योजना राबवण्यात आली. तसेच गरजू शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारे यंत्रे देण्यात आली. त्यातून शेती विकासाला चालना मिळाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येथील भाजीपाला फळांची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. खास शेतीविषयक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील ग्रामपंचायतीने 47 कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. वाहून जाणाऱ्या पाण्याला बांध घालून ते अडवण्याचं काम केलं आणि शेती व्यवसाय व त्यावर जोडधंदे बळकट केले.
कवी इंद्रजित भालेराव खूप छान म्हणतात की...'काट्या-कुट्याचा तुडवीत रस्ता, गावाकडं चल माझ्या दोस्ता'. हे खोरगावकरांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. कधीकाळी खोर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नव्हता. काही केल्या पिण्याच्या पाण्याची भटकंती काही थांबत नव्हती. त्यासाठी तरुण तडफदार सरपंच ज्ञानेश्वर चौधरी यांनी 2 कोटी 40 लाख रुपये खर्च करून तब्बल पंधरा किलोमीटर वरून वरवंड तलावातून गावात पाणी आणण्याचं काम 2010 साली केले. पुढे जाऊन या गावाची केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत निवड करण्यात आली. या गावातील उद्योगपतींनी गरज ओळखून पूर्व आणि पश्चिम दिशेला 'आरओ प्लांट' उभारून ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणी उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात या गावाला यश आले.
गावातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्याचा. यासाठी येथील गावकरी व पुढाऱ्यांनी 48.50 लाख रुपये खर्च करून तेही जिल्हा परिषद पुणे यांच्या साह्याने पंचक्रोशीतील सर्वात मोठं आरोग्य उपकेंद्र उभारले. कोविड काळातही गावातील नागरिकांचे 98 टक्के लसीकरण करण्यात आले. डॉक्टर, नर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत गावात अनेक उपक्रम राबवले जातात. आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जाते. या गावाची शैक्षणिक वाटचाल पाहिली तर गावात 7 अंगणवाडी शाळा, एक मिनी अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या एकूण सात शाळा आणि ज्याच्या कृपेने शपथ घेऊन कामाची सुरुवात केली ते गावच्या मध्यभागी असलेले भैरवनाथ विद्यालय आहे. एकूण आठ अंगणवाडी सेविका, सात मदतनीस, 32 प्राथमिक शिक्षक, 16 माध्यमिक शिक्षक गावात कार्यरत आहेत. शैक्षणिक वाटचालीत अनेक पुरस्कार येथील शाळेला मिळाले आहेत. 117 वर्षापूर्वीची शाळा असा जिल्हा परिषद शाळेचा इतिहास आहे. दिव्यांग रामदास लवांडे, मेंढपाळ म्हणून काम केल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झालेली प्रमिला शिंदे तसेच नीलम चौधरी, आदेश माळवदकर, पूजा चौधरी अशी उत्तम शैक्षणिक शिखरे गाठणारे विद्यार्थी येथूनच घडले. अंजीर रत्न समीर डोंबे हे यशोगाथा निर्माण करणारा नाव याच गावातलं. सामाजिक बांधिलकी, मंदिराचा जीर्णोद्धार, आमदाराचं लाडकं गाव,, पाणंद रस्त्यांची व्यवस्था, युवती व महिलांची सोयी सुविधा, सौर उर्जेवर चालणारे दिवे आवास योजना अशा प्रत्येक बाजूंनी परिपूर्ण गाव म्हणजे खोर गाव.
Comments