top of page

वाडीचं झालं गाव, आता खातंय भाव !

Updated: Jan 13, 2023

गाव करी ते राव न करी अशी आपल्याकडे म्हण आहे. पण कुठून तरी एक राव गुरुजी बनून येतो. पण झक मारली अन सरकारी नोकरी पत्करली असे गावातली परिस्थिती पाहून म्हणतो. एवढेच नाही तर नाईलाज म्हणून त्याच गावात राहतो आणि ज्या परिस्थितीला पाहून निघून चालले होते,
तीच परिस्थिती बदलून टाकतो. हेच गाव पुढे त्याचे गुरुजी, तुम्ही लई भारी जी म्हणून गुण गाऊ लागतो. याचे कारण म्हणजे या गुरुजींनी केलेला कायापालट. गुरुजींच्या प्रयत्नांना गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आज या गावाची शाळाच नाही तर अख्ख्या गावाचा नूर पार पलटून गेला आहे. यामुळे गाव करी ते राव न करी या म्हणीला पूर्णपणे मागे ठेवून ‘एक राव, त्याच्या साथीला गाव, त्यांनी मिळून अख्खा गावच बदलला ना राव!’ अशी नवी म्हण उदयाला घातली आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याच्या कुलाळवाडी नावाच्या भन्नाट गावाची ही भन्नाट गोष्ट...!

महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातील इतर गावं दिसतात, तसंच हे गाव सुद्धा एकेकाळी दिसायचं. उजाड, बोडक्या माळरानाचा विस्तार. पाऊस मुळातच कमी. त्यात जमीन म्हणजे निव्वळ मांजऱ्या खडक. पाच पिढ्यांपूर्वी बाबाजी कुळाला शेळ्या मेंढ्या चरत, पावसाळ्यातही मेंढ्यांच्या पायांना चिखल लागू नये अशा जागेच्या शोधात इथं आले आणि अगदी मेंढ्यांच्या योग्य जागा मिळाली म्हणून खुश होऊन इथंच स्थायिक झाले. तेव्हा इथे स्थायिक झालेली धनगर समाजाची वस्ती वाढत वाढत जाऊन आज तिथं गाव झालं आहे. आजही साम्भार टक्के धनगर समाज राहतो या गावात. कुळाला या आडनावावरून तेच नाव पडलेल्या या कुलाळवाडी गावात. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात.


आज अशी परीस्थिती आहे की, या गावात राहणारांना जगायचं असेल तर एकच पर्याय. मजुरीसाठी जाणे. गणपती विसर्जन झाले की मंडळी एक एक करून मुलाबाळांसह, सहकुटुंब सहपरिवार कामाच्या मागे जाणार. शक्यतो ऊस तोडीच्या. ते थेट पुढच्या पावसाळ्यातच गावात परत. त्यामुळे जूनमध्ये दिसणारा शाळेचा पट सप्टेंबर संपता संपता अर्ध्यावर यायचा. दिवसभर गावात शुकशुकाट आणि शाळा भरलेली असूनही शाळेत निरुत्साही शांतता. गावातली प्राथमिक शाळा सातवीपर्यंतच. तिथून पुढे शिकायचं तर गावापासून सात किलोमीटर अंतरावर जावं लागे. तेही चालत. कारण बस नाही. इतर कोणतेही वाहन नाही. त्यामुळे सातवी झाली की मुलींचा विवाह करून देण्याकडे पालकांचा कल असे.


अशा सगळ्या वातावरणात, मुळात अहमदनगर जिल्ह्यातल्या असलेल्या एका तरुणाला इथल्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात, घरापासून इतकी लांब मिळाली तरी, नोकरी तर मिळाली, यावर समाधान मानून हा तरुण शिक्षक, भक्तराज गर्जे, उसनं अवसान आणून नोकरीच्या ठिकाणी हजर झाला. पण त्या उघड्या बोडक्या माळरानावर बाजूच्या मांजरा खडकाच्या भाजून काढणाऱ्या त्या शुष्क वातावरणात त्याचा तो उसना उत्साह आणि करिअरबद्दलची स्वप्नं, सगळंच करपून गेलं. सरकारी नोकरी नसली तरी चालेल,कमी पगाराची असली तरी चालेल, पण दुसरी नोकरी बघून इथून निसटायचं, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले. अशी दोन वर्षे गेली. या काळात दुसरी नोकरी तर मिळाली नाही. पण तरुण वयातला उत्साह आणि बोलका स्वभाव यातून सर्व गावकऱ्यांशी चांगली ओळख झाली आणि त्यातून बोलता बोलता सप्टेंबरनंतर अर्ध्यावर येणाऱ्या शाळेच्या पटाबद्दल बोलणं सुरू झालं. त्याचं कारण समजलं. नकळत

विचार सुरू झाला या समस्येवर मार्ग शोधण्याचा

खरंतर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून ऊस तोडीच्या अथवा अन्य कामांवर मजुरीसाठी जाणाऱ्या आणि पावसाळ्यातच घराकडे जाणाऱ्या एका मोठ्या समाजगटाचा हा दीर्घकाळपासून अनुत्तरीत प्रश्न आहे, मुलांचं शिक्षण कसं, केव्हा करायचं? शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरही यासाठी दीर्घ काळापासून गंभीरपणे विचार, प्रयत्न आणि वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. पण विशेषतः ऊस तोडीच्या कामावर जाणाऱ्यांच्या मुलांच्या शाळेच्या समस्येवर ठोस उपाय अजून समोर आलेला नाही. राज्याला भेडसावणाऱ्या या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी नव्हे, तर आपल्या शाळेतल्या ७० ते १०० मुलांनी शाळा मध्येच सोडून जाऊ नये यासाठी काय करता येईल, याचा विचार गर्जे सरांनी सुरू केला.


पालकच गाव सोडून कामासाठी बाहेर गेले नाहीत तर मुलांच्या शिक्षणाची समस्याच राहत नाही. पण त्यासाठी त्यांच्या चरितार्थाची सोय गावातच उपलब्ध व्हायला हवी. तो मोठा विषय आहे. मग मुलांच्या शाळेचं, अभ्यासाचं नुकसान करून पालक मुलांना का घेऊन जातात, तर मुलांना खायला करून घालणारं, आई वडील नसताना त्यांच्यावर लक्ष ठेवणारं कोणी नाही म्हणून. यावर उपाय काय? मुलांना जेवण बनवता आलं पाहिजे, हा तो उपाय. मुलं बाकी पदार्थ बनवू शकतील. पण भाकरी? गर्जे सरांनी त्यांचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कबाडगे, अशोक गोदे, श्रावणकुमार कोरे, यासीन मणेरी, सोनिला वनखंडे, सुरेश राख, प्रमोद जाधव आणि किरण पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि मग कल्पना पुढे आली, भाकरी बनवण्याच्या स्पर्धेची. मुलींची नव्हे, मुलांची स्पर्धा. मुलींची मदत आणि शिक्षिका सोनिला वनखंडे यांचं मार्गदर्शन ती मुलं घेऊ शकतील. पण चूल पेटवणं, पीठ मळणं, भाकरी बनवून भाजणं, हे सगळं करायचं मुलांनीच, असं स्पर्धेचं सर्वसाधारण स्वरूप ठरलं.


दर शनिवारी सकाळी मुलांची प्रॅक्टिस सुरू झाली. या नव्या प्रयोगाचं कौतुक असलेले सरपंच, ज्यांचे खापर पणजोबा बाबाजी कुलाळ यांनी इथं गाव वसवलं, ते बजरंग कुलाळ हे सुद्धा प्रत्येक शनिवारी सकाळी शाळेत येऊ लागले. मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकू लागले. इतकंच नाही, त्यांनी पीठ मळणं, भाकरी भाजणं याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं. स्वयंपाकाची काम मुलींनीच करायची, या समजातून त्यामुळे मुलं लवकर बाहेर पडली. स्पर्धा ऐच्छिक असली तरी सगळेच त्यात सहभागी होऊ लागले आणि त्या भागातली वैशिष्ट्यपूर्ण, तीन महिने टिकणारी कडक भाकरी बनवू लागले. त्याबरोबर ते कालवण, भाज्या बनवायलाही शिकले.


मुलांचा जेवणाचा प्रश्न सुटला. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची, देखभालीची, त्यांची काळजी घेण्याची हमी या सर्व शिक्षकांनी दिली. मग कधी नव्हे ते पालक ऊस तोडीच्या कामावर गेलेले आणि तरी मुलं नियमितपणे शाळेत, असं चित्र हळूहळू दिसायला लागलं. घरी आई वडील नसल्यामुळे शाळेतच रमणाऱ्या या छोट्या मुलांसाठी मग हळूहळू इतर सुरू होऊ लागले. गर्जे सर शाळेतच राहतात. वीसएक मुलंसुद्धा त्यांच्या समवेत असतात. त्यांच्यामुळे इतर मुलं मुलीही असतात. या सगळ्यांसाठी बाल अभ्यासिका सुरू झाली. शाळा संपल्यानंतर ते रात्री साडेनऊपर्यंत सुरू राहणारी. मुलं या वेळेत अभ्यास करतात. आपसात अभ्यासाबद्दल बोलतात. हास्य विनोद मजा करतात.

ग्रामीण भागातल्या या मुलांना पुढे नोकरीसाठी शहरात गेल्यावर भाषेचा अडथळा येऊ नये यासाठी त्यांचा इंग्रजीत बोलण्याचा सराव करून घेतला जातो. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी शाळेचा हा भाकरीचा उपक्रम समजल्यावर शाळेला भेट दिली, तेव्हा सुषमा कुलाळ या विद्यार्थिनीने इंग्रजीतच त्यांना या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. याच सुषमाला तिचे वडील, सरपंच बजरंग कुलाळ यांनी कॉलेजला पाठवलं आणि इतर गावकऱ्यांसमोर लवकर लग्न न करता मुलींना शिकवलं पाहिजे, हा आदर्श कृतीतून घालून दिला. सुषमानंसुद्धा कॉलेजमध्ये संपूर्ण इंग्रजी माध्यमात शिक्षण असूनही त्यावर्षी पहिला क्रमांक पटकावला. आणि वडिलांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.


शाळेत एक वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. त्याला कुलूप नाही. कोणीही केव्हाही जाऊन तिथलं हवं ते पुस्तक घेऊन वाचत बसू शकतं. यात शालेय अभ्यासक्रमाला पूरक आणि शालेय वयातल्या मुलांनी वाचावीत अशी पुस्तक आहेत. या उपक्रमाचा मुलांना अर्थातच खूपच उपयोग झाला आहे. हॉलिडे - हॉबीडे नावाची संकल्पना एक अभिनव कल्पना आहे. सुट्टीच्या दिवशी मुलं शाळेत येतातच. आणि त्या दिवशी त्यांच्यातील कलागुणांची जोपासना, त्याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे गेली किमान पाच वर्ष, शाळेतली मुलं मुली आणि शिक्षक, एकही दिवस सुटी न घेता रोज सलग शाळेत येत आहेत.


आठवड्यातून एकदा शाळेत योग आणि प्राणायाम करून घेतला जातो. पण मुलं त्याचा सराव रोज घरी करतात. जुने टायर्स, मोडके सांगाडे अशा टाकाऊ वस्तूंपासून मुलांसाठी सायन्स पार्क आणि प्ले पार्क तयार करण्यात आला आहे. मधल्या कोविड काळात शाळा बंद असतानाही मुलं रोज शाळेत येऊन सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून पण या सायन्स पार्क आणि प्ले पार्क मध्ये रमायची. त्यामुळं अभ्यासाशी त्यांची नाळ जोडलेलीच राहिली. घराघरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून मुलं त्यात प्लास्टिकचा अन्य कचरा गच्च भरतात. त्यांचा विटा म्हणून शाळेच्या बांधकामांमध्ये वापर केला जातो. मागच्या सहा महिन्यात मुलांनी अशा प्रकारे साधारण सव्वाशे किलो प्लास्टिक वातावरणात इतरत्र पडण्यापासून रोखले आहे.


या सगळ्यात मुलं रमल्यावर आणि प्रत्येक उपक्रमात मुलांचा सहर्ष, उत्स्फूर्त सहभाग मिळायला लागल्यावर हाती घेतला गेला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प : राजमाता अहिल्यादेवी वनराई. त्या धगधगत्या भक्क माळावरच्या मांजऱ्या खडकात झाडं लावण्याचा प्रकल्प! या खडकात अक्षरशः पहारीने खड्डे खोदावे लागले. पाण्याचे मुळातच दुर्भिक्ष्य असल्याने कमी पाणी दिलं तरी कोरड्या वातावरणातल्या उन्हाच्या धगीने त्याची वाफ न होता ते पूर्णतः झाडाला मिळेल, अशा रीतीनं झाडं लावायला सुरुवात झाली. दरवर्षी १०० झाडं शाळेच्या भोवती लावायची आणि प्रत्येक झाड जगवायचं. अशी गेल्या बारा वर्षात बाराशे झाडं शाळेभोवतीच्या बारा एकर परिसरात वाढली आहेत. याशिवाय प्रत्येक मुला- मुलीनं त्यांच्या स्वतःच्या घराभोवती झाडं लावायची. त्यात किमान दहा झाडं ही फळझाडं असावीत. त्यांना पाणी वेगळं घालावं लागू नये यासाठी प्रत्येक झाडापाशी एक सपाट दगड ठेवून त्यावर घरातल्या लहान मुलांची अंघोळ, घरातली धुणं भांडी यासारखी काम करायची. यातून प्रत्येक झाडाला पाणी मिळून प्रत्येक झाड जगतं, वाढतं. अशी तीन हजार पाचशे झाडं वाढली. माजी सरपंच बजरंग कुलाळ यांच्या पुढाकाराने सध्याच्या सरपंच येसाबाई नेमाणे, उपसरपंच सुखदेव लोखंडे, धोंडीबा टकले, ग्रामसेवक शिवाजी पवार यांनी मनावर घेऊन गायरानात दहा हजार झाडांची लागवड केली. आणि १९२ हेक्टर फॉरेस्ट जमिनीवर एक लाख झाडं लावून जगवली.


शिवाजी तांबे, मोहन गुळदगड, संजय कुलाळ, संजय ईरकर, मारुती डोंबाळे, महादेव पडोळकर, काशिनाथ धडस, बयाजी टकले, धुळा गुळदगड, अंबाजी कुलाळ, प्रकाश करांडे, विष्णू बोरकर, म्हाळाप्पा मोटे सर, सावळा माने सर यांचे, आणि मायाप्पा तांबे, उत्तम सोलंकर, बिरदेव लोखंडे, सूर्यकांत कुलाळ, अरुण नेमाणे, दिलीप नेमाणे, गुलाब ठोंबरे, तानाजी ठोंबरे, सचिन कुलाळ या तरुणांचे या जवळपास सव्वा लाख झाडं लावून जगवण्यात आणि भकास बोडक्या माळावर चार वर्षांत जंगल उभारण्यात फार मोठं योगदान आहे. याशिवाय सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावात शंभर शोषखड्डे काढण्यात आले आहेत. त्यातून परसबाग फुलवल्या आहेत. बोर, करंज, कडुनिंब, सीताफळ, अशा झाडांच्या एक लाख बिया मुलं दर वर्षी गोळा करतात. त्याचे पन्नास हजार सीड बॉल तयार करून ते लोकांना वाटण्यात येतात. ज्याच्या त्याच्या परिसरात टाकण्यासाठी. छतावरून खाली येणारं पाणी वापरात आणलं गेलं आहे. इतक्या सगळ्या झाडांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात पडणारा पाला गोळा करून त्याचं खत तयार केलं जातं.


या सर्वाचा शाळेतल्या मुलांवर काय परिणाम झाला हे बघायचं असलं तर दोन उदाहरणं पुरेशी आहेत. संतोष दादासाहेब माने हा सातवीत शिकणारा मुलगा. त्यानं त्याच्या वडिलांकडं हट्ट धरला की मला गाय घेऊन द्या. तो ऐकेनाच म्हणताना कंटाळून वडिलांनी त्याला एक गाय घेऊन दिली आणि ऊस तोडणीच्या कामावर निघून गेले. ते परत आले तेव्हा संतोषकडं दोन गायी होत्या. आणि दूध विक्री करून साठलेले जवळपास ५० हजार रुपये होते. नऊ महिने पती-पत्नी दोघांनी मजुरी करून साठवले होते, त्याहीपेक्षा जास्त! त्यांनी ऊसतोडीच्या कामावर जाणं बंदच केलं. त्यांचं बघून इतर काही लोकांनी त्यांचं अनुकरण केलं. गावात आधी दहा गायी होत्या, त्या आता २०० झाल्या आहेत. एकच डेअरी होती तिथे आता पाच डेअऱ्या झाल्या आहेत.


दुसरं उदाहरण आहे कार्तिक महादेव माने या मुलाचं. त्यानं त्यांच्या शेतजमिनीत डाळिंबाची लागवड केली. वृक्ष लागवडीचं शाळेत मिळालेलं प्रशिक्षण आणि अनुभव यातून त्यानं अशी बाग फुलवली की, त्याचेही आई-वडील आज ऊस तोडीसाठी बाहेर जाणं बंद झालं आहे. पण यावर कळस चढवला तो सुशांत बजरंग कुलाळ यानं. पाणी फाउंडेशननं कुलाळवाडीची त्यांच्या कार्यक्रमासाठी निवड केली होती. बेलवडी येथे पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप प्रशिक्षण केंद्रात सुशांत सहभागी झाला. तिथून परत आल्यावर त्यानं याबाबत शाळेत माहिती दिली. पाणी फाउंडेशनच्या मदतीनं जलसंधारणाची कामं केली तर गावाचा पूर्ण कायापालट होईल, ही त्याला आणि शिक्षकांना खात्रीच होती. पण ही कामं गावकऱ्यांनी मिळून श्रमदानानं करायची असतात आणि श्रमदानाला कोणी तयार होत नव्हतं. मुलांनी एकी करून घरोघरी जाऊन या कामाबाबत त्यातल्या फायद्याबाबत प्रत्येकाला समजावून सांगितलं. आणि प्रत्यक्ष कामाची वेळ आली तेव्हा टिकाव फावडं हातात घेऊन काम करायसाठी मुलांनीच पुढाकार घेतला. सगळे शिक्षक, बजरंग कुलाळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गावातील ज्येष्ठ आणि तरुणही मग एकदिलाने या कामात सहभागी झाले. सरपंच बजरंग कुलाळ यांची डेअरी होती. रोज संध्याकाळी दूध जमा करण्याच्या वेळीच त्यांना गर्जे सरांचा फोन येई, या इकडं, की सरपंच निघाले डेअरी तशीच उघडी ठेवून. लोक येत. दूध घालत. स्वतःच दुधाचा हिशोब लिहून ठेवत. शाळेतला एखादा मुलगा किंवा मुलगी कधी असेल तर ते हा हिशोब ठेवत. पूर्ण पंचेचाळीस दिवस अशा प्रकारे डेअरी उघडी. आणि परस्पर सगळी कामं, हिशोब चोख होत होती. पण यातून २.३० लाख घनमीटरची कामं झाली. परिणामी उन्हाळ्यातही गावातल्या विहिरींचं पाणी आटत नाही. हातानं घेता येतं. त्यामुळं जवळपास ७०० पेक्षा जास्त एकर जमिनीवर शेती सुरू झाली. त्यातली १५० एकर डाळिंबाची शेती आहे. ऊस तोडीच्या कामावर जाणाऱ्यांपैकी ३० टक्के लोकांना त्यामुळे कामासाठी बाहेर जायला न लागता गावातच कायम थांबणं शक्य झालं आहे. आता हे कामासाठी बाहेर जावं लागणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी करत दहा टक्के पर्यंत खाली आणण्याचं सर्वांचं मिळून उद्दिष्ट आणि प्रयत्न आहेत.


आता घराघरात पर्जन्यमापक बसवला गेला आहे. मुलं रोज किती पाऊस पडला याची आकडेवारी काढतात. गावाच्या एकूण क्षेत्रावर किती पाऊस झाला याची आकडेवारी काढतात. त्यातून किती पाणी मिळालं, भूगर्भात साठलं, त्यात लोकांच्या दैनंदिन वापराला किती, गुरांना पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी किती, आणि झाड आणि शेतीसाठी किती पाणी वर्षभरात उपलब्ध होऊ शकतं, याचा ताळेबंद मांडतात. आणि त्यानुसार कोणती पिकं गावातल्या शेतकऱ्यांनी घ्यावी, अथवा घेऊ नये, हे सांगतात. आणि गावकरी त्या मुलांचं ऐकतात !


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुलाळवाडी (ता. जत, जि. सांगली) इथं मुलांना खऱ्या अर्थानं जीवन शिक्षण मिळतं!. जलसंधारणाच्या या प्रयोगावर गर्जे सरांनी एकांकिकेचा कच्चा आराखडा तयार केला. त्यावर शाळेतल्या मुला मुलींनी एकांकिका बसवली आहे. त्यातली काही मुलं मुली खरंच खूप दर्जेदार, कसलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय करतात. आता बालविवाह, वृक्ष संवर्धन, जलसंधारण अशा वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधन करणारी पथनाट्ये आणि एकांकिका या हरहुन्नरी मुलांनी बसवली आहेत.


या सगळ्याचा आणखी एक झालेला परिणाम म्हणजे पूर्वी सातवी झाल्याबरोबर मुलीचा विवाह लावून दिला जात असे. आता दहावी पास झाल्यावर मग विचार सुरू होतो. सुषमा बजरंग कुलाळचं उदाहरण घेऊन कॉलेजलाही मुली जायला लागल्या की मग क्रमानं बारावी, पदवीपर्यंतचं शिक्षण या गावातल्या मुलींना बिनघोरपणे घेता येईल, अशी सुचिन्ह आहेत...

हे सार उभं झालं ते एकूण २७ मुद्द्यांवर काम केल्यामुळं. त्यातल्या काही मुद्यांना इथं फक्त स्पर्श केला आहे. खरंतर यातला प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आणि स्वतंत्र लेखाचा विषय होण्यासारखा आणि तितका महत्त्वाचा आहे. एवढ्या व्यापक पातळीवर काम उभं राहणं, आणि त्याचं सूक्ष्म नियोजन करून ते अपेक्षित परिणामांपर्यंत यशस्वीपणे नेणं, हे अर्थातच टीम वर्क आहे. शाळेतले शिक्षक, माजी सरपंच बजरंग कुलाळ, ग्रामपंचायतीचे सारे सदस्य, ग्रामसेवक, सारे पालक, गावकरी, आणि अर्थातच, या साऱ्यांचा केंद्रबिंदू असलेली त्या शाळेतली मुलं मुली यांनी सर्वांनी मिळून संपूर्ण राज्याला दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या एका समस्येवरचं उत्तर कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे. पण या साऱ्यामागची सर्जक कल्पनाशक्ती निःसंशयपणे भक्तराज गर्जे सरांचीच आहे, हे तिथे प्रत्येकालाच माहीत आहे, आणि मान्यही आहे. मागच्या पाच वर्षांत एक दिवसही सुटी न घेता शाळेतच राहणाऱ्या गर्जे सरांना स्वतःलाही कुटुंब आहे. त्यांची पत्नी नाशिक येथे नोकरी करते. त्यांना दोन गोड मुली आहेत. गावाचे प्रश्न सुटले. आता (तरी) कुटुंबाला, संसाराला वेळ दिला पाहिजे, असं म्हणून त्यांनी नाशिकच्या जवळ बदली मागितली. ती झाली जळगाव जिल्ह्यात! पण सांगली जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा जवळ, असं म्हणून ते समाधान करून घेतात. अर्थात तिथंही ते शुष्क कोरड्या निर्लेपपणे नोकरी करतील, अशी शक्यताच नाही. जळगाव जिल्ह्यातले म्हणूनही काही प्रश्न असतील. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला ते पूर्ण ताकतीने भिडतील, हे निःसंशय.

कुलाळवाडीच्या ग्रामस्थांना, ग्रामपंचायत सदस्यांना, ग्रामसेवकांना, उपसरपंच आणि सरपंचांना, बजरंग कुलाळ यांना, कुलाळवाडी शाळेतल्या सर्व मुला मुलींना, आणि त्यांच्या लाडक्या गर्जे सरांना आमचा सलाम! महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या एका गंभीर समस्येवर तुम्ही कृतीतून उपाय सिद्ध करून दाखवला आहे! महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र आपले कृतज्ञ आहे!


コメント


bottom of page