राजकारणातील प्रस्थापितांचे ‘मक्ते’ उद्ध्वस्त केलेला ‘दादा’
- Virendra Patil
- Nov 21, 2023
- 3 min read
- सुरेश उज्जैनवाल
जातीपातीच्या राजकारणाचा बोलबाला सर्वत्र असतो आणि जातिगत प्राबल्याच्या बळावर सत्तेची सर्व क्षेत्रे आपल्याच हाती राहावीत याकरीता प्रस्थापित राजकीय नेतृत्व कायम सक्रीय असतं. वंचित छोटे जातसमूह, छोटे आणि कुठल्याही संधीचा अभाव असलेल्या लोकांचा अगदी चंचूप्रवेशही जिथे प्रस्थापित लोकांना नको असतो तिथे वंचितांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपले दादा सुरेशदादा जैन..

जातिगत राजकारणाचे प्रचंड स्तोम माजलेल आपण अनुभवत आहोत. जातीगत प्राबल्याच्या वर्तुळाभोवती केंद्रित झालेले राजकारण वंचित, उपेक्षितांसाठी जणू अभिशापच ठरत आले आहे. परंतु राजकीय क्षेत्रातील सामाजिक विषमता दूर करून राजकारणातील प्रस्थापितांची वर्षानुवर्षाची मक्तेदारी हद्दपार करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात सर्व प्रथम कुठे झाला असेल, तर तो जळगावात झाला होता आणि तो प्रयोग करणारे जाती, धर्माच्या पलीकडचे अफलातून व्यक्तीमत्व म्हणजे माजी मंत्री सुरेशदादा जैन हे होत. या झंजावाती नेत्याचा आज वाढदिवस, ते निमित्त साधून त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीचे सामाजिदृष्ट्या-राजकीय विश्लेषण करण्याचा केलेला प्रयत्न..वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांचे अभिष्टचिंतन...
सर्वसामान्य जळगावकरांच्या हृदयातील "दादा" नावाच्या झंझावाताची योग्य ती नोंद किंवा दखल बुद्धिजीविंच्या वर्तुळात आजवर घेतली गेलेली नाही,राज्यात व जिल्ह्यात गेल्या तीन- चार दशकांत फार थोडे असे नेते झाले ,की ज्यांनी राजकारणाचा वापर केवळ सत्तेसाठी न करता खऱ्या अर्थाने समाजकारणासाठी केला. मिळालेली पदे,सत्ता स्वतःसाठी नव्हे तर बहुजनांच्या विकासासाठी राबविली,त्यात सुरेशदादा जैन हे अग्रणी असे जनमान्य नेते आहेत . कमालीचा आत्मविश्वास,विलक्षण कार्यक्षमता, दृढ संकल्प आणि काळाच्याही पुढे असणारी दृष्टी लाभलेला नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण झालेले दादा आज कुठल्याही पदावर नाहीत वा सक्रिय राजकारणात नाहीत तरीही त्यांना अनुयायांची उणीव भासत नाही, त्यांच्या निवासस्थानातील उपस्थिती कधीच ओसरत नाही, हे त्यांचे खास . समाज व जनतेशी असलेली नाळ अखंडित रहावी म्हणून एसडी - सीड या आपल्या कौटुंबिक संस्थेतर्फे हजारो होतकरू विद्यार्थ्याना गेल्या दिड-दशकापासून अखंडितपणे दर वर्षी शिष्यवृत्ती योजना राबवित आहेत. अलीकडे कोणताही नेता वैयक्तिक, राजकीय लाभाशिवाय लोकहिताच्या, जनतेच्या आर्थिक लाभाच्या योजना राबवित नाहीत ,मात्र दादा त्यास सन्माननीय अपवाद आहेत.
वंचित,बहुजनांसाठीचे शाश्वत नेतृत्व -
दादा हे व्यवहार निपुण आणि उद्योग,व्यापारी प्रवृत्तीचे पण राजकारणात पदार्पण केल्यानंतर ते पूर्णपणे सर्व समाजाधिष्ठीत झाले. त्यांची सक्रिय राजकारणातील सुरुवात सन १९७८ मध्ये झाली. राजकारणातील प्रारंभ हा झंझावातीच होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जळगावातील जाहीर सभेला तत्कालीन शासन, प्रशासनाचा विरोध झुगारून खान्देश मिल मध्ये इंदिरा गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था केली व त्यांची जाहीर सभा यशस्वी करून तत्कालीन शासनकर्ते यांना आपल्या बाणेदारपणाची जाणिव करुन दिली. हे त्यांनी अशावेळी घडवून दाखविले जेव्हा की ते सार्वजनिक जीवनातल्या कुठल्याही पदावर नव्हते, हे विशेषत्वाने नोंदवायला हवे.
या घटनेनंतर खऱ्या अर्थाने दादांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांची पहिली राजकीय जाहीर सभा हि माझ्या गावी वरणगाव येथे गांधी चौकात झाली होती आणि ती आयोजित करणारे अगदीच सामान्य कार्यकर्ते वरणगावकर कै. राजाभाऊ देशमुख, सतीश देशमुख, अशोक तडवी, भरत चौधरी, गफ्फार शेख ईब्राहिम आदी होते. त्यानंतरच दादांच्या जिल्हाभर सभांचा सिलसिला सुरू झाला. दादांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा घेतला तर दिसून येते की, त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली.त्यांना सुरवाती पासून प्रस्थापितांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. प्रस्थापितांच्या आव्हानास ते पुरून उरले. त्यामुळे त्यांनी आपल अख्खं राजकीय आयुष्य बहुजन,वंचित आणि मागास समाजासाठी खर्ची घातले. त्याची सुरुवात तत्कालीन जळगाव पालिकेतून करीत या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रस्थापितांची राजकीय मक्तेदारी अखंडितपणे उद्धवस्त केली, असे उदाहरण राज्याच्या इतर शहरात किंवा विभागात नाही. जळगाव पालिका, जिल्हा परिषद, दूध संघ, जिल्हा सहकारी बँक, बाजर समिती, विधान परिषद,अश्या अनेक संस्था मध्ये नवीन नेतृत्व उदयास आणले.अशा समाज घटकांना राजकारणात संधी दिली ज्यांनी कधी त्याची अपेक्षाही केली नसावी. उदाहरण द्यायचे झाल्यास (स्व.)वकील शरद वाणी यांचे देता येईल. असा कोणताही समाज त्यांच्या नजरेतून सुटला नाही,ज्याला त्यांनी स्थानिक पातळीवर संधी दिली नाही. प्रस्थापितांच्या मक्तेदारीचा पूर्णपणे बिमोड करणारे ते एकमेव शिलेदार म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

आव्हानांना स्वत:च्या बळावर प्रतिआव्हान देणारा आणि तेवढ्याच ताकदीने ते लीलया परतवून लावणारा गेल्या पन्नास वर्षात खान्देश विभागात तरी दादा व्यतिरिक्त अन्य कोणी नेता नाही. केवळ सत्ताधारी राजकारणी नव्हे तर प्रबळ प्रशासनास देखीक लोकहितार्थ कधी जुमानले नाही,मग त्यासाठी वाटेल ती किंमत त्यांना मोजावी लागली तरी ती त्यांनी मोजली.असे विलक्षण असामान्य बाणेदार चारित्र्य संपन्न नेतृत्व जळगाव च्या क्षितिजाला लाभले..ही अत्यंत दुर्मिळ बाब म्हणता येईल.
(स्तंभलेखक हे जेष्ठ पत्रकार व व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकारांच्या संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष आहेत.)
Comments