top of page

शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा महोत्सव : ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’

नवतंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान संशोधित केलेली गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता आणि उत्तम मार्गदर्शन


शिवार वार्ता । टीम ग्रामगौरव


शेती माती आणि पाण्याच्या संदर्भात सातत्याने प्रयोगशील राहिलेल्या जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून जैन उद्योग समूहाची उभारणी झाली आहे. जैन इरिगेशनच्या माध्यमातून 'हायटेक शेतीचा नवा हुंकार' या वैशिष्ट्यपूर्ण कृषी महोत्सवाला जैन हिल्स च्या प्रांगणामध्ये सुरुवात झालेली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील असंख्य शेतकरी या महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. केवळ उत्पादनाची विक्री करणे हा उद्देश या महोत्सवाचा नसून शेतकऱ्याच्या पदरात उत्पन्नाची रास पडावी हा उदात्त हेतू घेऊन जैन परिवारातील सर्व सदस्य या महोत्सवात उत्साहाने सहभागी झालेले आहेत. शेतकऱ्याचे भले व्हावे यासाठी जैन हिल्सच्या विविध प्रयोगशाळांमध्ये तयार झालेले नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या माहितीतून निश्चितपणे फायदा होणार आहे. 10 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या या कृषी महोत्सवातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेल्या तंत्रज्ञानाची एक ओळख..



देशातच नव्हे तर जगभरामध्ये, जळगावचे नाव अभिमानाने कोरून ठेवणाऱ्या जैन इरिगेशन मध्ये गेल्या दहा डिसेंबर पासून 'हायटेक शेतीचा नवा हुंकार' हा वैशिष्ट्यपूर्ण कृषी महोत्सव सुरू झालेला आहे. जैन हिल्स च्या प्रांगणामध्ये विविध उत्पादनांची माहिती देणारे डेमो स्टेशन उभारण्यात आलेले आहेत. या प्रत्येक डेमो स्टेशन जवळ जैन इरिगेशनचे सहकारी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात आहेत. हे सर्व सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करत आहेत.


'हायटेक शेतीचा नवा हुंकार' ची गरज का?

वर दिलेला प्रश्न साधारणपणे सर्वांना पडणं स्वाभाविक आहे. कारण आपल्या सभोवताली शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी घडत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भातील 'हायटेक शेतीचा नवा हुंकार' ची गरज का आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहिल्यास ते निश्चितपणे सापडेल. कारण गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा एक जबरदस्त फटका अवकाळी पाऊस आणि गारपीट च्या माध्यमातूनआपण सर्वांनी अनुभवला आहे. या अवकाळी आणि गारपीट चा सर्वात मोठा फटकाशेतकऱ्यांना बसलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सातत्याने अनुभव शेतकऱ्यांच्या वाट्याला येत असतो.


कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी वारा, वादळ -

गारपीट या गोष्टी आपल्याला ज्ञात असून त्यावर मात करण्यासाठी समस्त शेतकरी वर्ग व केळी बागायतदार आटोकाट प्रयत्न करीत आहे. परंतु शाश्वत असा मार्ग आजतागायत सापडला नाही. परिणामी मागील काही दशकांपासून वातावरण बदलाचा फटका कमी-जास्त प्रमाणात बसू लागला. मागील 30 वर्षाच्या कालखंडात 21 ते 22 वेळा केळी बागांचे मोठे नुकसान झाले. आता वर्षातून 3 ते 4 वेळा केळीला वारा, वादळ, गारपिटीचा फटका आलटून-पालटून वेगवेगळ्या प्रदेशात बसू लागले आहेत.

शासन पातळीवर शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते हा जरी संशोधनाचा विषय असला तरी देखील शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या जैन उद्योग समूहाने हायटेक शेतीचा नवा हुंकारच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकलेले आहे. या कृषी महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाबरोबरच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञान या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


शेतकऱ्यांसमोर पर्याय कोणते?

हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती आणि शेती समोरील उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती करून देण्याचा हा महोत्सव आहे. साधारणपणे आपण असे पाहतो की गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसात उत्तर प्रदेशातील केळी बागा कोलमडून पडल्या आहेत. वादळाने जैन हिल्सवरील केळी बागेतली 240 झाडे कोलमडली. परंतु जैन हिल्सच्या परिसरात उभ्या असलेल्या नेट हाऊस मधील केळी पिकांना वादळाचा फटका बसलेला नव्हता. या नेट हाऊस मधील केळी पिकांची पाने देखील फाटलेली नव्हती. एकंदरीत सांगायचा उद्देश असा की मोकळ्या जागेत लावलेली केळी पिकांचे मोठे नुकसान झाले तर नेट हाऊसमधील केळी पीक सुरक्षित राहिले.


हा आहे हायटेक शेतीचा नवा हुंकार -

इथून पुढच्या काळात केळी उत्पादकांना अशा पद्धतीने बंदिस्त व नियंत्रीत वातावरणातील लागवडीचा शाश्वत विचार करणे गरजेचे आहे. प्रथम दर्शनी हे तंत्रज्ञ आपणास महागडे वाटू शकते परंतु आज टर्की, मोरोक्को, इस्त्राईल या देशांमध्ये केळीची शेत फक्त पॉली व नेट हाऊसमध्येच होत आहे. कारण हाच केळीला चिरंतर व शाश्वत ठेवण्याचा मार्ग आहे. इतर सर्व पिकांसाठीही हाच मार्ग यापुढील काळात वापरावा लागेल त्यामुळे आता तंत्रज्ञानाकडे वळणे जरूरीचे आहेच आणि शिवाय काळाची देखील गरज आहे.


केळीचे नवतंत्रज्ञान काय सांगते?

केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये खूप मोठी आहे. याबरोबरच आपण सर्व जाणतो की केळी हे नाजूक पीक आहे. या पिकाची काळजी घेणे, पिकाचा सांभाळ करणे तसेच केळी फळाची निर्यातीपर्यंत सर्व व्यवस्था लावणे हे सोपे काम नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये जैन इरिगेशनचे केळीच्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या उपयोगाचे ठरणारे आहे. हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना ही केळीच आहे.

केळीच्या विविध जाती, इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळीचे अतिशय देखणे प्लॅन्ट या महोत्सवासाठी उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, 30 फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षीक प्लॅन्ट या महोत्सवासाठी उभे असून सर्व शेतकऱ्यांना जैन इरिगेशनचे अभ्यासू सहकारी उत्साहाने माहिती देत आहेत.



केळीची हवामान आधारित परिशुद्ध शेती -

यामागील संकल्पना अशी आहे की, कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याबरोबरच केळी पिकावर येणाऱ्या संसर्गापासून सुटका करण्याचे उपाय कोणते, याचा प्रयोग शेतकऱ्यांना दाखविणे ही आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना चांगला बाजार भाव मिळेल. मग यासाठी जैन इरिगेशनच्या प्रयोग शाळेत तयार करण्यात आलेली उती संवर्धीत केळीची रोपे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचे उद्देश जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी घेतले आहे. यासाठी केळीचे संपूर्ण लागवडीचे तंत्रज्ञान, गादीवाफ्याचे अच्छादनासह, ड्रिप इरिगेशन आणि मशागतीचे आधुनिक तंत्रज्ञान याबद्दलची संपूर्ण माहिती या कृषी महोत्सवामध्ये देण्यात येत आहे. तसेच तयार झालेल्या पिकाचे म्हणजे केळी फळाचे आच्छादन कसे करावे, गुणवत्ता पूर्ण केळी निर्यातीसाठी कशी पाठवावी अशा संपूर्ण बारीक सारीक गोष्टींचे प्रशिक्षण या ठिकाणी शेतकऱ्यांना जैन इरिगेशनचे सर्व सहकारी देत आहेत.


नेट हाऊसमध्ये केळी लागवडीचे फायदे -

मोकळ्या जागेतील केळीची शेती आणि नेट हाऊसमधील केळीची लागवड या दोघांमध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो. हा फरक अधिक स्पष्टपणे जाणवतो ज्यावेळी आपण जैन इरिगेशनच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात सहभागी असतो. कारण या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या केळीचे प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळते. मोकळ्या जागेतील केळीचे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान, केळी पिकाची खुंटलेली वाढ आपण या ठिकाणी पाहू शकतो. दुसरीकडे नेट हाऊस मधील दमदारपणे उभी राहिलेली केळी पिके पाहून आपण आश्चर्यचकित होतो. या ठिकाणी शेतीच्या नवतंत्रज्ञानाची ओळख आपल्याला होते. नेट हाऊस मधील केळी लागवडीचे फायदे आपल्याला येथे अधिक स्पष्ट होतात.

नेट हाऊस मधील केळी लागवडीचे फायदे असे..

1. बागेचे वारा-वादळ, गारपीटपासून संपूर्ण संरक्षण.

2. सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून बागेचा बचाव.

3. नेटहाऊसमध्ये फॉगर व मिस्टींग सिस्टीम्सद्वारे मायक्रोक्लायमेंट निर्मिती.

4. जळगांवसारख्या कोरड्या वातावरणात नेटहाऊसमध्ये आर्द्रता निर्माण.

5. मायक्रो स्प्रिंकलर प्रणालीद्वारे बागेचे फोलीयर पोषण.

6. झाडावर फवारा पद्धती असल्यामुळे त्याद्वारे बुरशी नाशकाची फवारण येते व करपा व इतर रोगांचे नियंत्रण.

7. नेटहाऊसमुळे थ्रिप्सचा प्रादुर्भाव नाही म्हणून बड इंजेक्शन व बंच फवारणीचा खर्च कमी.

8. हिवाळ्यात चिलींग इन्जुरीपासून बागेचा बचाव करणे शक्य.

9. बागेला आधार देण्याची गरज नाही.

10. बागेची सशक्त वाढ झाल्यामुळे उत्पादन व गुणवत्ता जास्त.



फळ पिकांसाठी उत्तम मार्गदर्शन -

हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ही केळी पिकाशी संबंधित असली तरी देखील महोत्सवामध्ये आपण अन्य फळ वर्गीय पिकांची आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानया ठिकाणी पाहू शकतो.कृषी महोत्सवाच्या या प्रांगणामध्ये केळी बरोबरच आंबा, पेरू, सीताफळ, चिकू, डाळिंब आणि पपई या पिकांचे डेमो प्लॉट उभारण्यात आलेले आहेत. अतिसघन लागवड पद्धत ज्याप्रमाणे केळी पिकाच्या लागवडीचे तसेच निर्यातीच्या संदर्भातील उत्तम मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना केले जात आहे. त्याचबरोबर अन्य फळांच्या संदर्भातील सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अतिसघन लागवड पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कशी वाढ होते हे या ठिकाणी प्रयोगातून सादर केले आहे. अतिसघन लागवड पद्धत वापरल्यामुळे फळबागांचा फुले व फळे लागण्याचा कालावधी कमी होतो तसेच उत्पादकता व उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यास हातभार लागतो.

अतिसंघन लागवड पद्धतीमध्ये दोन ओळीमध्ये जास्त व दोन झाडांमध्ये कमी अंतरावर फळ झाडांची लागवड केली जाते. याबरोबरच वेळोवेळी फळझाडांच्या छाटणीद्वारे झाडाचा घेर व्यवस्थापन केले जाते. याबरोबरच फळ पिकांचे अचूक पोषण आणि सिंचन करून व्यवस्थापनाची अतिशय उपयुक्त माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जात आहे. केवळ माहिती देऊनच न थांबता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून फळ पिकांसाठी लागणारे नव तंत्रज्ञान कोणते आहे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले जात आहे.


हळदीच्या 20 प्रजाती -

साधारणपणे प्रत्येक घरातील जेवणामध्ये हळदीचा वापर केला जातो. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये हळदीचे महत्त्व नोंदविण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खाण्यामध्ये हळदीचा समावेश असतो. हळदीच्या पिकाचे उत्तम व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पीक म्हणून हळदीचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो, हा एक ठाम विश्वास या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यासाठी जैन इरिगेशनच्या आधुनिक प्रयोग शाळेमध्ये हळदीच्या विविध जातींवर संशोधन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये हळदीचे लागवड व्यवस्थापन कसे करावे, खरेदीचे नेमके धोरण काय आहे याविषयी माहिती देण्यात येत आहे. साधारणपणे एक डोळा पद्धतीने वाढवलेल्या रोपांची लागवड करून उच्च प्रतीच्या रोगमुक्त रोपांचा पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये हळदीच्या 20 प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत. त्यांची नावे अशी : केदारम, मेघा, झाशी लोकल, राजेंद्र सोनाली, अलेप्पी, प्रभा, मेघालय लोकल, राजेंद्र सोनीया, प्रतिभा, वायगांव, सुवर्णा, सेलम, सुदर्शना, सिलेक्शन-01, सिलेक्शन-02, सिक्किम, कुल्लू लोकल, फुले स्वरुपा, पितांबर, प्रगती.



मॉरिशसच्या शेतकऱ्यांनी केले कृषी महोत्सवाचे कौतुक -

हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्स ला ठिबक संच ऊसाची रोप लागवड करून ठिबक व फर्टीगेशन तंत्राचा वापर केला आहे. तापमान वाढीवर नियंत्रणासाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर यंत्रणा बसविली आहे. जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात असलेल्या ऊस शेतीचा अभ्यास करून त्यापद्धतीने शेती करावी यातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग मिळेल मॉरिशेस देशातील पोर्ट लुईस येथील प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनचे वितरक विकास कोबल्लोल यांनी केले.

विकास कोबल्लोल यांनी ऊसाची शेतीसह कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेली आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्यात. यामध्ये केळी, आंबा,

जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, अद्रक यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती बघतिली.


शेतकऱ्यांना हायटेक तंत्रज्ञानाचा मार्ग दाखवणारा महोत्सव -

जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार हा शेती महोत्सव शेतकऱ्यांना हायटेक तंत्रज्ञानाचा नवा मार्ग दाखवणारा आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी नोंदवली आहे.जैन हिल्स वर 10 जानेवारी 24 पर्यंत सुरू असलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. तंत्रज्ञानातून पिकपद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे अनुभवले.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीसाठी ते आले होते. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच चर्चा करताना इतर शेतकऱ्यांनीही या महोत्सवात सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी सांगितले की, 'एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकांची लागवड जैन हिल्स कृषि महोत्सवात दिसून आली. यात केळी हे आपल्या भागातील प्रमुख पीक आहे. आर्थिक चलनवलन या पिकातून मोठ्याप्रमाणात होत असते. त्यात सात ते आठ प्रकारची केळी लागवड, ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पीक, 30 फूट उंचीचे केळीचे पिक अशी एकाच ठिकाणी विविध केळी पिकांची लागवड बघायला मिळत असल्याचे ते म्हणाले. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेता येत आहे. तंत्रज्ञानासोबतच कुठले पीक घ्यावे, कसे घ्यावे, कुठली व्हरायटी लावावी, असे एकच ठिकाणी वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे ते म्हणाले. शिवाय हळद, अद्रक, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग असल्यामुळे शेतकऱ्यांनी नव्या शेतीचा हा नवा मंत्र ओळखून तो आत्मसात करायला हवा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


कृषी महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये -

1. शेतीच्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी

महोत्सवाचे आयोजन.

2. जैन हिल्स च्या प्रांगणामध्ये आयोजित कृषी महोत्सवास दररोज हजारो शेतकऱ्यांची भेट.

3. प्रात्यक्षिक आणि पिकांच्या प्लॅन्टसह आधुनिक शेतीचे उत्तम मार्गदर्शन.

4. फळबाग, केळीचे व्यवस्थापन सांगणारे आदर्श व्यवस्थापन याठिकाणी उपलब्ध.

5. शेती आणि शेतीशी संबंधित असलेल्या अवजारांची मोठी रेंज या ठिकाणी उपलब्ध आहे.

6. लसूणच्या आठ जाती महोत्सवात पाहायला मिळतात.

7. हळदीच्या 20 प्रकारच्या जाती महोत्सवामध्ये आपण पाहू शकतो.

8. ऑटोमेशन तंत्रज्ञानातून घरी बसून शेती करणे कसे शक्य आहे याचे प्रात्यक्षिक महोत्सवात देण्यात येत आहे.

9. केळीच्या सहा जातींबरोबरच लाल केळीची बाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

10. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्याचे नव तंत्रज्ञान कोणते,याविषयी सखोल मार्गदर्शनमहोत्सवात केले जात

आहे.

11. हा कृषी महोत्सव 10 डिसेंबर ते 14 जानेवारी 2024 दरम्यान साजरा होत आहे.

 

 
 
 

Comments


bottom of page